"ज्यांच्याकडे शिवसैनिकच नाहीत ती शिवसेना कसली?"

17 Mar 2024 15:30:07

Thackeray & Shinde


मुंबई :
ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नाही त्याला आपण शिवसेना कशी म्हणू शकतो? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नंदूरबार येथील उबाठा गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अनेक लोकं शिवसेना, धनुष्यबाण, चुकीचा निर्णय असं काहीतरी म्हणतात. पण ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नाही त्याला आपण शिवसेना कशी म्हणू शकतो? ५० आमदार, १३ खासदार, विधानपरिषदेचे ६ आमदार आणि विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यादेखील आपल्यासोबत आहेत. आज शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचारांसाठी आपल्यासोबत येत आहेत. त्यामुळे २०१९ ला चुकीचा निर्णय कोणी घेतला हे जनतेला स्पष्टपणे दिसलं आहे."
हे वाचलंत का? - उबाठा गटाला दणका! नंदूरबारचे आमदार शिवसेनेत दाखल
 
"खरंतर शिवसेना, भाजप युतीचं आपलं सरकार स्थापन व्हायला हवं होतं. एकीकडे बाळासाहेबांचा आणि दुसरीकडे मोदीजींचा फोटो ठेवून आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लढलो. पण निकाल जाहीर झाल्यानंतर आपले प्रमुख लोकं म्हणाले की, आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत. मात्र, शिवसेना-भाजप युती म्हणून आपण लढलो असताना आपल्यासमोर एकच दरवाजा उघडा होता. त्यामुळे त्याच दिवशी संपुर्ण महाराष्ट्राला जाणीव झाली की, दाल मे कुछ काला है. त्यानंतर लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर असा कार्यक्रम सुरु झाला," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "राजकारणात असं चालत नाही. राजकारणात नितिमत्ता, उद्देश, विचारधारा हे सगळं पाळावं लागतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की, आता शिवसेनेचं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत आहे आणि स्वत:च्या मोहापायी कुणीही पक्ष दावनीला बांधू शकत नाही. घटनेमध्येसुद्धा हे लिहिलेलं आहे की, लोकशाहीमध्ये एखाद्या प्रमुखाने चुकीचं पाऊल उचलल्यास पक्षातील कार्यकर्त्यांनी अन्यायाविरुद्ध जाब विचारायला हवा," असेही ते म्हणाले.
 
 

Powered By Sangraha 9.0