मुंबई : CAA ला विरोध करणारे उद्धव ठाकरे खरंच बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? अशी शंका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्याबाबत कोणतीही शक्यता नाही, असेही ते म्हणाले आहेत. ते एनडीटीव्ही इंडीया या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्याबाबत कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे ते काही प्रयत्न करत असतील तर मला माहिती नाही. पण आमच्याकडून असा कोणताही प्रयत्न सुरु नाही. राजकारण बाजूला ठेवल्यास मला एका गोष्टीचं दु:ख आहे की, उद्धव ठाकरेंनी मतांच्या राजकारणात सीएए कायद्यालाच विरोध केला. त्यामुळे मला कधी कधी वाटतं की, ते खरंच बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत का? ज्यांनी सीएएला विरोध केला आहे."
"उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या काळात काहीही अडचण आल्यास अधिकारी मला सांगायचे आणि मीच त्यांची मदत करायचो. मुंबई शहरात जी कामं आता होत आहेत ती २० वर्षांपूर्वीच व्हायला हवी होती. उद्धवजींना लोकांनी भरपूर संधी दिल्या. परंतू, त्यांना त्याचा उपयोग करता आला नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांच्या लोकांनी केलेलं मुंबईतील असं एक तरी काम दाखवा जे आयकॉनिक आहे, असं एकही काम नाही. संपुर्ण मुंबईतील सांडपाणी समुद्रात जातं. त्यामुळे तिथे दुर्गंधी येते. मी मुख्यमंत्री असताना तीन वर्ष मागे लागून केंद्र सरकारसोबत बसून हे काम पूर्ण केलं. उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांनी हे केलं नाही. सरकार बदलल्यानंतर आम्ही हे काम पूर्ण केलं," असेही त्यांनी सांगितले.