मुंबई : काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. 'काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्यं केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते. काँग्रेस नसती तर भारतात दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, आतंकवादाची मालिका झाली नसती. याशिवाय काँग्रेस नसती तर ३७० सारख्या ऐतिहासिक चुका झाल्या नसत्या आणि एक सशक्त भारत तयार झाला असता," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - ठाकरेंचा आणखी एक नेता शिंदेंकडे जाणार!
परिवारवादावर बोलताना ते म्हणाले की, "राजकीय व्यक्तींचे मुलं, नातू राजकारणात आलेत पण ते स्वबळावर आलेत. परंतू, पात्र लोकांना दूर सारून आपल्या परिवारावरच लक्ष केंद्रित करण्यात येतं त्याला परिवारवादी राजकारण म्हणतात. हे काँग्रेसमध्ये झालं. काँग्रेस संपण्याचं कारण म्हणजे त्यांना वाटायचं की, नेहरूजींच्या घराण्यातील व्यक्तीच काँग्रेसचे प्रतिनिधित्व करु शकतो. आजही हीच स्थिती आहे."
"आज मल्लिकार्जून खर्गे जरी काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. फक्त राहूल गांधी, सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधीच निर्णय घेऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुटण्याचंही हेच कारण आहे. शरद पवारांनी अजित पवारांना तयार केलं आणि नंतर त्यांना वाटलं की, आपल्या मुलीने पक्ष सांभाळायला हवा. हाच प्रकार शिवसेनेतही आपण बघितला. उद्धवजींना वाटतं आदित्यला पुढे आणण्याच्या दृष्टीने आपण राजकारण करायला हवं. आदित्यला पुढे आणण्याच्या नादात त्यांनी विचारधारा सोडली आणि बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्याला विरोध केला त्या विचारधारेला त्यांनी स्विकारलं. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली. परंतू, आता या प्रथेला आळा घालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यापुढे राजकारण्यांची मुलं आपल्या बळावरच राजकारणात दिसतील," असेही ते म्हणाले.