मुंबई : शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. रविवारी शिवाजी पार्कवर राहूल गांधींची सभा आयोजित करण्यात आली असून उद्धव ठाकरेदेखील या सभेत सहभागी होणार आहेत. यावरुन आता बावनकुळेंनी टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. त्याआधी या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. इथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही आहे."
हे वाचलंत का? - काँग्रेस नसती तर भारताचे...; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्यं
"ज्या बाळासाहेबांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, माझे दुकान बंद करेन.’ राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करत नाही. ते का करत नाही, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे आहे का? आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आज याच शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटकाच्या कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? हा प्रश्न आहे. जर उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थामुळे विसरले असतील, तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका!," असा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिला आहे.