मुंबई : उबाठा गटाचे नंदूरबारचे आमदार आमश्या पाडवी यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आमश्या पाडवींच्या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी बोलताना आमश्या पाडवी म्हणाले की, "आम्ही सर्व एकाच पक्षात असताना माझी निवड झाली. पक्षात काम करत असताना मला दोनदा शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळाली. त्यानंतर माझी विधानपरिषदेत निवड झाली. मी ज्या नंदूरबार जिल्ह्यात काम करतो तिथला विकास अजूनही झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला आहे."
हे वाचलंत का? - "शिवतीर्थावर उद्धव ठाकरे राहूल गांधींपुढे शरणागती पत्करणार का?"
"लहानातल्या लहान कार्यकत्यांसह सर्वांनी मला विनंती केली की, आपल्या भागाच्या विकासासाठी ज्या सर्वांनी आपल्याला आमदार केलं त्यांच्यासोबत आपण जायला हवं. विशेष म्हणजे ज्या काँग्रेस पक्षासोबत आम्ही वर्षानुवर्षे लढत आलोत त्यांना आम्ही मदत कशी करणार? माझ्या अतिदुर्गम भागातील परिस्थितीबाबत मी नेहमीच बोलत आलो आहे. इथले पाणी प्रश्न, कुपोषण आणि रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इकडे आलो आहे. आम्ही मोठा विश्वास ठेवून साहेबांसोबत आलो आहोत. आमच्या नंदूरबार जिल्ह्यातील प्रश्न आपण सोडवावे, अशी आमची ईच्छा आहे," असेही ते म्हणाले.