रत्नागिरी तालुक्यातील काजीरभाटी, वरवडे आणि पाटीलवाडी या गावांसाठी समुद्री शेवाळ वरदान ठरले आहे. २०२२ साली 'क्लायमा क्रू प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीने 'महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागा'च्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्यात समुद्री शेवाळ शेतीचा प्रकल्प सुरू केला. याला 'महिला आर्थिक विकास महामंडळ' आणि 'कम्युनिटी मॅनेज्ड् रिसाॅर्स सेंटर'ची मदत मिळाली. 'क्लायमा क्रू' कंपनीने 'इंडियन सेंटर फॉर क्लायमेट अॅण्ड सोसायटल इम्पॅक्ट रिसर्च'च्या (आयसीसीएसआयआर) मदतीने सर्वप्रथम गावकऱ्यांना समुद्री शेवाळ लागवडीचे प्रशिक्षण दिले. २०२२-२३ साली वरवडे गावात दोन महिन्यात समुद्री शेवाळाचे सहा टन उत्पादन मिळाले. सध्या हा प्रकल्प वरवडेसह, काजीरभाटी आणि पाटीलवाडी गावात राबविण्यात येत आहे. यंदा या तिन्ही प्रकल्पामधून पुढील दोन महिन्यात ५० टन समुद्री शेवाळाचे उत्पादन होणार आहे. या शेतीमधून तिन्ही गावातील २६८ लोकांना अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे. 'क्लायमा क्रू' कंपनीच शेवाळाच्या उत्पादनात मदत आणि विक्री करत असल्याने गावकऱ्यांना थेट रोख स्वरुपात उत्पन्न मिळत आहे.
तिन्ही गावांमध्ये 'कॅपाफायकस अल्वारेझी' या प्रजातीच्या समुद्र शेवाळाची लागवड केली जाते. रत्नागिरीचे सागरी वातावरण या प्रजातीच्या वाढीसाठी पोषक आहे. तसेच तिची वाढ ४५ दिवसात जलद गतीने होत असल्याने शेतीकरिता या प्रजातीची निवड करण्यात आली आहे. लागवडीच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने बांबू तराफा पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. समुद्रामध्ये तराफ्याला ३० ते ४० किलो समुद्र शेवाळ बांधल्यानंतर साधारण ४५ दिवसानंतर त्यामधून २५० किलोचे उत्पादन मिळत असल्याची माहिती 'क्लायमा क्रू'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (सागरी) स्वप्नील सुरेंद्र तांडेल यांनी दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. याशिवाय 'लाॅग लाईन', 'इंटीग्रेटेड मल्टी-ट्रॉपिक एक्वाकल्चर' (आयएमटीए) आणि 'फ्लाॅटिंग कल्टिवेशन मॉड्यूल' अशा लागवडीच्या पद्धतींची चाचणी प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असल्याचे तांडेल म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे याचठिकाणी या समुद्री शेवाळाचे बियाणे देखील तयार करण्यात येते. तर मच्छिमारांनी नैसर्गिक अधिवासामधून आणलेल्या शेवाळातूनही खतनिर्मिती होत आहे.
समुद्री शेवाळाचे उपयोग
समुद्री शेवाळ हे 'मॅक्रो ऍलग्गे' या गटात मोडते. 'समुद्री शेवाळ' ही नवनिर्माण करण्यायोग्य सेंद्रिय सामुग्री आहे. त्याचा वापर जैवइंधन, बायोप्लास्टिक, सौंदर्य प्रसाधने, मानवी अन्न, खतनिर्मिती आणि औषधनिर्मिती होतो. रत्नागिरीत उत्पादित होणाऱ्या 'कॅपाफायकस अल्वारेझी' या समुद्री शेवाळापासून प्रामुख्याने सेंद्रिय खत,औषधनिर्मिती, बायोप्लास्टिक तयार केले जाते.
समुद्री शेवाळ शेतीमधून आम्हाला रोजगाराचे साधन मिळाले आहे. या शेती प्रकल्पासाठी दत्तगुरू महिला बचत गटामधील आम्ही सर्व महिला काम करत असून मी प्रशिक्षक म्हणून याठिकाणी काम करते. यामाध्यमातून महिलांना प्रतिदिवस ३०० रुपये रोजंदारी मिळते. - वर्षा गोरिवले, अध्यक्ष, दत्तगुरु महिला बचत गट