नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केल्यानंतर विरोधी पक्षातील काही नेते अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांच्या याचं प्रोपोगेंडाला गृहमंत्री अमित शहांनी उत्तर दिले आहे. त्यातच पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर मोर्चा काढला.
सीएए लागू झाल्यास लोक बिनदिक्कतपणे देशात येतील, जसे स्वातंत्र्यानंतर झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा दावा केजरीवाल यांनी केला होता. केजरीवाल यांच्या दाव्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले, “दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर त्यांचा संयम सुटला आहे. त्यांना माहीत नाही की सर्व लोक भारतात आले आहेत आणि राहत आहेत. फक्त त्यांना अधिकार मिळालेले नाहीत. त्यांना अधिकार देण्याची ही बाब आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "२०१४ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व देण्याची चर्चा आहे. एवढीच काळजी असेल तर बांगलादेश घुसखोरांबद्दल का बोलत नाही, रोहिंग्यांबद्दल का बोलत नाही. कारण ते व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळेच ते व्होट बँकेचे राजकारण करत आहेत."
अमित शहा यांना विचारण्यात आले की, अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, सरकार आपल्या लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही, मग ते कसे देणार? यावर अमित शहा म्हणाले की, केजरीवाल रोहिंग्यांसाठी कधीच काही बोलले नाहीत. ते केवळ बौद्ध, हिंदू, पारशी, ख्रिश्चन आणि शीख निर्वासितांना विरोध करत आहेत.
ते म्हणाले, “हे लोक फाळणीचा काळ विसरले आहेत. हे निर्वासित आपली करोडोंची संपत्ती सोडून इथे आले. आम्ही त्यांच्या समस्या का ऐकणार नाही? त्यांना इथे नोकरी आणि शिक्षण मिळत नाही. आपण त्यांच्याबद्दल सहानुभूती का व्यक्त करणार नाही? देशाची फाळणी करण्याचा निर्णय त्यांचा नव्हता. काँग्रेसनेच हा निर्णय घेतला आणि त्यांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले. आता ते त्यांच्या आश्वासनावर ठाम नाहीत.”
एकीकडे अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर हे सर्व सांगितले. दुसरीकडे, हिंदू निर्वासितही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर हातात झेंडे घेऊन निदर्शने केली. यावेळी मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. केजरीवाल यांची माफी मागावी अशी घोषणाबाजी करताना महिलाही दिसल्या. महिलांच्या हातात पोस्टर्स लिहिलेले दिसत होते - “लबाड केजरीवाल, सीएए कायद्यावर अफवा पसरवू नका, जनतेला सत्य सांगा.”