मुंबई : 'श्री अन्न उत्कृष्टता केंद्र' बारामतीऐवजी सोलापूरमध्ये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे केंद्र बारामतीला हलविण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आधीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांनी या वर्षांला ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूर येथे ‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र’ सुरू करण्याची घोषणा केली होती.
त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सोलापूर जिल्हा हा ज्वारी, बाजरी, मका अशी भरड धान्ये पिकवण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आले होते. पंरतु २४ नोव्हेंबर २०२३ रोजी हे केंद्र बारामतीला स्थापन करण्यासंदर्भात सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले. त्यावरून सोलापूरमधील शेतकरी आणि काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधकांनीही टीकेची संधी साधली होती.
त्यामुळे हा निर्णय पुन्हा बदलून 'श्री अन्न उत्कृष्टता केंद्र' सोलापूरमध्येच स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्याचप्रमाणे भाजपाचे आमदार सुभाष देशमुख हे देखील त्यासाठी आग्रही होते.