निलेश लंकेंच्या भूमिकेचं महाराष्ट्रात स्वागत : संजय राऊत
14 Mar 2024 18:03:45
मुंबई : निलेश लंके शरद पवार गटात आले तर त्यांच्या भूमिकेचं महाराष्ट्रात स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर राऊतांनी भाष्य केलं.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "निलेश लंकेंच्या घरवापसी पेक्षा शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे. निलेश लंके पुन्हा लोकसभा निवडणूक लढणार असतील तर महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत आहे," असे ते म्हणाले. काल राहूल गांधी आणि उद्धवजींमध्ये चर्चा झाली असून त्यांनी उद्धवजींना सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना खास निमंत्रण दिले आहे," असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाविषयी बोलताना ते म्हणाले की, "महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा जाहीर करणार आहोत. महाविकास आघाडीच्या ४८ मतदारसंघांची यादी एकाच वेळी जाहीर करणार आहोत," असेही ते म्हणाले.
दरम्यान, निलेश लंकेंच्या प्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "समोरच्या लोकांकडे उमेदवार नसल्यामुळे ते वेगवेगळ्या लोकांना सोबत घेत आहेत. काही लोकांनी निलेश लंकेंच्या मनात खासदारकीची हवा घातली आहे," असेही ते म्हणाले.