पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते निलेश लंके आणि माजी मनसे नेते वसंत मोरे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी हे दोन्ही नेते पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरु असताना गुरुवारी शरद पवारांच्या हस्ते लंकेंच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. याचवेळी निलेश लंके पक्षप्रवेळ करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावर "मी निलेश लंकेसोबत चर्चा केली. त्याला मी काही गोष्टी नीट समजून सांगितल्या आहेत. पण काही लोकांनी तू खासदार होशील अशी हवा त्याच्या डोक्यात घातली आहे," अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
दुसरीकडे, वसंत मोरे यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातूनच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला असून त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आता ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.