महायुतीतील ८० टक्के जागावाटप पूर्ण! उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

14 Mar 2024 13:46:22

Mahayuti


मुंबई :
महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाले असून लवकरच उरलेल्या २० टक्के जागांचा निर्णय होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. अवघ्या काही दिवसांतच लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होणार असून सर्व पक्ष कामाला लागले आहेत.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "महायुतीच्या जागावाटपाची एक शेवटची बैठक अजून राहिलेली आहे. पहिल्या बैठकीत ८० टक्के जागांबद्दल निर्णय झाला असून २० टक्के जागांबद्दलचा निर्णय अजून बाकी आहे. पुढील बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय होणार आहे. त्यानंतर प्रत्येक पक्ष आपापल्या जागा जाहीर करतील. भाजपने मात्र, त्यांच्या ठरलेल्या जागा जाहीर केलेल्या आहेत," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - काही लोकांनी लंकेंच्या मनात खासदारकीची हवा घातली : अजित पवार
 
मित्रपक्षांनी एकोपा ठेवण्याची गरज!
 
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली असून बारामतीतून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "विजय शिवतारेंबद्दल माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणं झालेलं आहे. महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामदास आठवले असे काही मित्रपक्ष आहेत. या सर्वांनी एकोपा ठेवण्याची नितांत गरज आहे. काही पक्षातील लोकांना जर काही वक्तव्य करायची असल्यास त्यांनी महायुतीला किंवा एनडीएला त्रास होणार नाही असा प्रयत्न करायला हवा. तसेच कुणाला काही सांगायचं असल्यास त्यांनी आपापल्या पक्षप्रमुखाला सांगायला हवं," असेही ते म्हणाले.
 

Powered By Sangraha 9.0