नाटकाच्या मध्यंतरामध्ये बहिणीचे अपघाती निधन झालेले कळूनही, ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत, नाटकाचा प्रयोग करणार्या, नाट्यधर्मी सुशील इनामदार यांचा कलाप्रवास...
सुशील इनामदार यांचा जन्म मूळचा मुंबईचा. सुशील यांचे वडील माणिक इनामदार पोलीस खात्यात कार्यरत होते, तर आई सुनीता इनामदार गृहिणी. सुशील यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात झाले. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन आणि पदवीचे शिक्षण त्यांनी वाणिज्य शाखेत सिद्धार्थ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर २००६ पासून आतापर्यंत जवळजवळ १८ वर्षं सुशील इनामदार हे मुंबई पोलीस खात्यात ‘हवालदार’ म्हणून कार्यरत आहेत.सुशील इनामदार यांना लहानपणापासूनच नाट्यकलेचे विशेष आकर्षण. कारण, शालेय जीवनात ’रविकिरण’सारख्या बालनाट्य स्पर्धांमधून अभिनय करण्याची संधी त्यांना मिळाली होती. सुशील यांच्या आईलाही गायन कलेची विशेष आवड होती. त्यामुळे सुशील यांनीही गायन शिकावे, असे त्यांना वाटत असे. परंतु, सुशील यांचा ओढा गायन कलेऐवजी नाट्यकलेकडे अधिक होता. त्यामुळेच महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर ’आयएनटी’, ’मृगजळ’, ’इप्टा’ यांसारख्या अनेक नामांकित एकांकिका स्पर्धांमध्ये सुशील इनामदार यांनी सहभाग घेतला आणि महाविद्यालयाला भरघोस पारितोषिके मिळवून दिली.
विशेष म्हणजे, ’मुंशी शिल्ड एकांकिका’ स्पर्धेत सुशील इनामदार यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पारितोषिकदेखील मिळाले होते. त्यावेळी त्यांच्याच महाविद्यालयात असणारे, विठ्ठल डाकवे हे एका मालिकेचे सहदिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयातल्या नवोदित कलाकारांना ऑडिशनसाठी बोलावले. आता ऑडिशनसाठी सुशील इनामदारसुद्धा गेले आणि त्यांची त्या मालिकेसाठी निवड झाली.पुढची जवळजवळ एक ते दीड वर्षं सुशील ’सह्याद्री’ वाहिनीवरील ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेत झळकले. दरम्यान, मधल्या काळात सुशील यांना दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी ’सर आले धावून’ या नाटकात काम करण्याची संधी दिली. या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे प्रमुख भूमिकेत होते. ”लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत घालवलेला, तो क्षण अविस्मरणीय होता आणि तिथेच अभिनयाचे विद्यापीठ माझ्यासाठी खुले झाले,” असे सुशील आवर्जून सांगतात. त्यानंतर सुशील यांनी ‘गेट टूगेदर’, ’जय जय रघुवीर समर्थ’, ‘इन्शाल्लाह’, ’उद्ध्वस्थ धर्मशाळा’ यांसारख्या अनेक प्रायोगिक नाटकांत त्यांनी काम केले. तसेच ’टुरटुर ’, ’श्यामची आई’, ’रघुपती राघव राजाराम’, ‘नटसम्राट’, ’शेखर खोसला कोण आहे?’, ’पडद्याआड’ यांसारख्या व्यावसायिक नाटकातही सुशील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या.
मात्र, पोलीस खात्यात रुजू झाल्यावर, सुशील यांना जवळजवळ सहा-सात वर्षं रंगभूमीवर काम करता आले नाही. परंतु, पोलीस खात्यातून राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी घेता येतो, हे कळल्यावर सुशील यांनी पुन्हा रंगभूमीवर अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर २०११ साली हिटलरच्या आयुष्यावर आधारित (The death of a conqueror ) या नाटकात अभिनय करून, त्यांनी ‘कमबॅक’ केला. हेच नाटक सुशील यांच्या नाट्य प्रवासाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. कारण, पोलीस कल्याण विभागाने सादर केलेले, हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत संपूर्ण महाराष्ट्रातून विजेते ठरले. स्पर्धेच्या सर्व नऊ पारितोषिकांसह प्राथमिक आणि अंतिम फेरीत सुशील इनामदार यांना अभिनयाचे रौप्यपदक मिळाले. तसेच अनेक वाहिन्यांनी पुरस्कृत केलेले सन्मान त्यांना त्यावर्षी मिळाले. दरम्यान, या प्रवासात सुशील यांना त्याच्या वरिष्ठांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. तसेच अजित भगत, बुद्धदास कदम, सुनील कदम, कमलेश सावंत या गुरुवर्यांकडून अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. सुशील यांची नाट्य क्षेत्रातील कारकिर्द लक्षात घेतली, तर वेगळा ठसा उमटवून, त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय का घेतला, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. पण, वडिलांच्या निधनानंतर घरच्या परिस्थितीमुळे ते पोलीस खात्यात रुजू झाले. पण, तिथेही रंगभूमीशी जोडलेली त्यांची नाळ तुटली नाही.
’फू बाई फू’, ‘गोठ’, ‘हे मन बावरे’, ‘नवरी मिळे नवर्याला’, ‘लेक माझी दुर्गा’ यांसारख्या मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या, तरीदेखील पोलीस खात्यातील कामाला मी प्राधान्याने महत्त्व देतो, असे सुशील सांगतात. पण, या सगळ्यात पत्नी रुपाली इनामदार आणि आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाने मोलाची साथ त्यांना दिली. त्यामुळेच मेहनतीच्या आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर सुशील यांनी २०१४ ते २०१६ या वर्षातील महत्त्वाचे अनेक नामांकित पुरस्कार आपल्या अभिनयाच्या जोरावर पटकावले. सध्या सुशील पोलीस कल्याण विभागाकडून ’एकेक पान गळावया’ या नाटकात अभिनय करत आहेत. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामाची दखल घेत, त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावे दिला जाणारा ’झेप पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यामुळे भविष्यात उत्तम नाटक आणि चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे सुशील सांगतात. दै. ’मुंबई तरुण भारत’कडून सुशील इनामदार यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
सुप्रिम मस्कर