रामललाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर ही गुड न्यूज तुमच्यासाठी!

13 Mar 2024 23:17:13

Ramlala

लखनौ : (Ramlala Aarti Entry Pass)
अयोध्येत श्रीरामललाच्या दर्शननासाठी दररोज सरासरी एक ते दीड लाख भाविक मंदिराला भेट देत आहेत. सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करण्याची मुभा आहे. मात्र पहाटे ४ वा. होणारी मंगला आरती, सकाळी ६.१५ वा. होणारी श्रृंगार आरती आणि रात्री १० वा. होणारी शयन आरतीचा लाभ भाविकांना घेता येत नव्हता. आता हा लाभ घेता येणार असून यासाठी विशेष प्रवेशपत्राची व्सवस्था मंदिर न्यासकडून करण्यात आली आहे.

हे प्रवेशपत्र मोफत असून श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या न्यासच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहे. मंगला, श्रृंगार व शयन आरती व्यतिरिक्त इतर आरती करताना प्रवेशपत्राची गरज भासणार नाही. प्रवेशपत्रासाठी अभ्यागताचे नाव, वय, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि शहराचे नाव यासारखी माहिती आवश्यक आहे.

दर्शनासंदर्भात काही महत्त्वाची माहिती :
श्री रामजन्मभूमी मंदिरात प्रवेश करण्यापासून ते दर्शनानंतर बाहेर येण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत सरळ आणि सोपी आहे. साधारणपणे ६० ते ७५ मिनिटांत भाविकांना रामललाचे दिव्य दर्शन सहज मिळते. श्री रामजन्मभूमी मंदिरात निश्चित शुल्क किंवा कोणताही विशेष पास घेऊन दर्शनाची सोय नाही. तरीही दर्शनासाठी पैसे घेतल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या तर फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो. मंदिरात वृद्ध आणि दिव्यांगांसाठी व्हील चेअर उपलब्ध आहेत. 
Powered By Sangraha 9.0