सावर रे

    11-Mar-2024
Total Views |
शिशिराच्या आगमनाआधीच त्याच्या स्वागताची तयारी सुरू झालेल्या वसंतातील सौंदर्याचे वर्णन करणारा आणि काटेसावर या वृक्षाची महती सांगणारा हा लेख...



katesavar

वसंत ऋतूच्या स्वागताची तयारी शिशिरातच होते. वसंतामधील सुंदर फुलोर्‍याचे सौंदर्य पौषातील निष्पर्ण फांद्या आणि खोडात दडलेले असते. शिशिरातील निसर्ग सौंदर्य धुक्याच्या ‘कॅनव्हास’वर रेखाटताना, मला भावलेला वृक्ष म्हणजे काटेसावर. झाडावर असणार्‍या असंख्य काटे, डहाळ्या आणि खोडाचे निष्पर्ण सौंदर्य बरेच काही सांगून शिकवून जाते. काटे सावरीची शिशिरातील पानगळ झाल्यावर, झाडाच्या उर्ध्वगामी डहाळ्या या दुर्गा भागवत यांना कलात्मकतेने मुरडल्यासारख्या वाटतात, त्यांना सावरीच्या निष्पर्ण झाडात कुशल नर्तकीने कंबरेला बाक देऊन, खेळकर हावभावाची मुद्रा दिसते, तर मला त्या फांद्या जुन्या मेणबत्तीच्या झुंबराच्या वळलेल्या बाहुसारख्या वाटतात.


वसंतात या फांद्यांना लालचुटूक ज्वालांसारखी फुले आल्यावर, ती उपमा अगदी साजेशी होते. त्यांना सावरीच्या काट्याचा नूर रडवा वाटत नाही, खोडावरचे काटे अंगातून थरारून उठणार्‍या हर्षाच्या लहरींचे मूर्त स्वरूप वाटतात. काहींना हे काटे अजस्त्र दीपमाळेसारखे वाटतात. आसामी दंतकथेनुसार, झाडावर चढलेल्या कालीया नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी कोणी झाडावर चढू नये म्हणून, झाडावर असलेल्या राक्षसाने आपले दात काढून खोडात रोवले आहे असे म्हणतात, तर द्रौपदीने दिलेल्या शापामुळे या झाडावर काटे आले अशीदेखील एक दंतकथा आहे. मला हे काटे थंडीमुळे अंगावर आलेले शहारे वाटतात. या झाडास संस्कृतमध्ये ‘यमद्रम’ असेही म्हणतात, यांची मुळे खोल नरकात जातात असे म्हणतात. पशु-पक्षी आणि वृक्ष यांच्या बरोबर वाईट व्यवहार करणार्‍या लोकांना यांचे काटे टोचले जातात. पण, होळीसाठी ज्यावेळी हे झाड तोडले जाते, त्या लोकांना कुठली शिक्षा आहे? ते देवच जाणो! या झाडाला येणार्‍या लालचुटुक फुलांचे ज्वालासारखे मधुर द्रव भरलेले पेले मला यमास दिपदान केलेल्या दिव्यासम भासतात; पण शेवटी शिमग्याला सावरीच मरण ठरलेलंच. ज्या वृक्षाच्या छायेत सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रम्हदेव विसावले होते, त्या सावरीचाच असा संहार होतो, हे दुर्दैव.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावक:

हे वरदान होलीका बरोबरच दृष्ट माणसांना शिक्षा देणार्‍या आणि नरकातून उगवणार्‍या सावरीला हवे, नाही का? पौराणिक भूगोलाच्या संकल्पनेनुसार शाल्मली द्वीप सप्तद्वीपांपैकी एक आहे, यावर शाल्मली वृक्ष असल्यामुळे त्यास असे नाव पडले आहे. या द्वीपाच्या चारही बाजूने ऊसाच्या रसाचा समुद्र आहे अशी कल्पना केली गेली आहे, रसाचा समुद्र आहे का ते माहिती नाही पण, फुलातला गोड रस पिण्यासाठी शिंजीर, भोरडी, हळद्या, साळुंखी, जंगली मैना, कोतवाल, वटवट्या आणि सातभाई आणि असे एकूण जवळपास 50 प्रकारचे पक्षी येतात. यातूनच सावरीची परोपकारी वृत्ती दिसून येते. या विषयी एक कथाही प्रचलित आहे. एकदा काटेसावरीला आपण पवन देवतेपेक्षा सक्षम आहोत आणि वारे वाहण्यामुळे आपल्याला काहीच होणार नाही, असा गर्व झाला. हे सर्व ऐकून पवन रागात हिमालयात गेला आणि लवकरच हिरव्यागार अभिमानाने उभ्या असलेल्या शाल्मली वृक्षाजवळ आला. शाल्मले! पवन ओरडला. मी तुला इतक्या शतकांपासून वाचवले आहे. कारण, माझे आजोबा ब्रह्मा, सृष्टीचे निर्माते, एकदा तुझ्याच सावलीत विसावले होते. पण, आता तू माझा अपमान करण्याचे धाडस केले आहेस. यापुढे मी तुझी अशी अवस्था करेन की, तुझे एकही पान उगवणार नाही. शाल्मलीने तितक्याच रागाने उत्तर दिले. तुला वाटेल ते कर. मी तुझ्या क्रोधाला घाबरत नाही. रात्र पडली. शाल्मली विचारात पडली आणि तिला समजले की, तिचा अहंकार चुकीचा आहे. स्वतःला शिक्षा द्यायची ठरवली. तिने आपली सर्व पाने गाळली. आपल्या सर्व फांद्या तोडून पवनाची वाट पाहू लागली. काही क्षणातच पवनदेव तेथे प्रकटले. त्याने आपले सैन्य म्हणजे पाऊस, गारवा, गारा, बर्फ, गडगडाट आणि विजा सोबत आणलेच होते. प्रत्येक सैनिक रागाने लढाईसाठी पुढे गेला. आणि मग पवन देव थांबले. त्याने नम्रपणे वाट पाहत असलेले झाड पाहिले, त्याचे सर्व वैभव कमी झाले आहे, त्याचे डोके वाकले आहे. हे पाहून पवनदेवांचा राग शांत झाला. मी तुला हीच शिक्षा द्यायला आलो होतो, ते म्हणाले. पण आता तुला तुझी चूक कळली आहे. मी तुझ्यावर रागवणार नाही, असे म्हणत पवन स्वर्गलोकात परतले.




katesavar

शाल्मलीने तिच्या फांद्या आणि पाने परत वाढवली. पण, ही आठवण कायम राहावी म्हणून आणि आपण पुन्हा कधीही गर्विष्ठ होऊ नये म्हणून, दरवर्षी काटेसावर स्वेच्छेने शिशिरात आपली पाने गाळते. वनांचे शास्त्रीय जीवनचक्र पाहिले तर तो जैविक तालबध्दतेचा एक भाग आहे पण या दंतकथेमधून नव्या फुलांसाठी आणि पालवीसाठी झालेली पानगळ ही मनुष्य जिवनात कितीही संकटं आली तरी धीर आणि नवी उमेद देणारी मार्गदर्शक ठरते. पानगळ झालेली ही सावर, बाहेरुन काटेरी पण आतून मऊ. शिशिरात पानगळ पत्करून लवकरच वसंतामध्ये लाल, किंवा पिवळ्या फुलांची काटेसावर, तर केशरी फुलांनी देवसावर बहरते. फळ धारणेनंतर मऊ मखमली रेशमी कापूस देणारी ही सावर कठीण परिस्थिती आणि संकटातून सावरलेली म्हणूनच सावरीला, ‘सावर रे!’ असेच म्हणावे वाटते.

- किशोर सस्ते
(लेखक वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक आहेत.)