आफ्रिकेपेक्षा ही भारतातील सिंह सुरक्षित असं नमूद करणारा आययुसीएनचा अहवाल समोर. भारताच्या गुजरात राज्यातील सिंह १९ पटींनी अधिक सुरक्षित
मुंबई (विशेष प्रतिनिधी): आफ्रिकेतील सिंहांपेक्षा भारतातील गुजरामधील सिंह (asiatic lion) अधिक सुरक्षित आहेत, असे नमूद करणारा 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'चा (आययूसीएन) अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यापूर्वी 'नष्टप्राय' (क्रिटिकली एनडेंजर्ड) श्रेणीमध्ये असणाऱ्या आशियाई सिंहांची आता 'आययूसीएन'ने 'संभाव्य संकटग्रस्त' (व्हल्नरेबल) श्रेणीमध्ये नोंद केली आहे.
गुजरात हे जगातील आशियाई सिंहांचे एकमेव अधिवास क्षेत्र आहे. जगात गुजरात आणि मध्य व पश्चिम आफ्रिकेत सिंह आढळतात. यापूर्वी गुजरातमधील आशियाई सिंहांचे वर्गीकरण 'पँथेरा लिओ पर्सिका' या शास्त्रीय नावाने करण्यात आले होते. मात्र, आता 'आययूसीएन'ने या तिन्ही प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या सिंहांच्या अनुवांशिक समानतेमुळे त्यांना एकत्र करुन त्यांचे वर्गीकरण 'पँथेरा लिओ लिओ' या एकाच शास्त्रीय नावामध्ये केले आहे. 'आययूसीएन'च्या अंदाजानुसार, आज जगात २३ हजार सिंह आहेत, ज्यात गुजरातमध्ये ६७४ सिंहांचा अधिवास आहे. 'आययूसीएन'च्या म्हणण्यानुसार, आफ्रिकेमध्ये सिहांची संख्या ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. आफ्रिकेमध्ये सातत्याने होणारा अधिवासाचे नुकसान आणि शिकारीचे वाढलेले प्रमाण हे सिंहांची संख्या कमी होण्यास कारणीभूत आहेत.
आफ्रिकेमध्ये सिंहांच्या तीन पिढ्यांपैकी ३३ टक्के घट होण्याची शक्यता असून, भारतात ही टक्केवारी केवळ २ टक्के इतकीच असल्याचे टआययूसीएनटने नमूद केले आहे. सुरक्षित अधिवास आणि शिकारीपासून बचाव या दोन कारणांमुळे सिंह भारतात अधिक सुरक्षित राहू शकतात, असेही 'आययूसीएन'च्या अहवालात म्हंटले आहे. गुजरातमधील केवळ जुनागड या एकाच जिल्ह्यात आढळणारे सिंह आता मात्र राज्याच्या १० जिल्ह्यांमध्ये विखुरले आहेत. आफ्रिकेपेक्षा गुजरातच्या काही भागांमध्ये सिंहांना अधिक संरक्षण आणि जागांची उपल्ब्धता ही करून दिली आहे. तसेच, मानव-सिंह संघर्षाचे प्रमाण अधिक असले, तरी भारतातील समाजाने त्यांच्याप्रती सद्भावना दाखवत त्यांच्यासोबत सहजीवन स्वीकारले आहे.