अधीरविरोधात ममतांचा ‘खेला’

11 Mar 2024 20:52:56
Trinamool


एकीकडे राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात दाखल होत असताना, तिकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ’एकला चलो रे’ची भूमिका घेतली आणि प. बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे, या ४२ जागांमध्ये दीदींनी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दीदींचे मन वळवू, असा विचार काँग्रेसने केला खरा; पण दीदी बंगाली जनतेचं ऐकतं नाही, न्यायालयाचं ऐकतं नाही, तिथं काँग्रेस किस झाड की पत्ती! दीदींनी भव्य सभा घेऊन, उमेदवार जाहीरदेखील करून टाकले आणि तिकडे राहुलबाबा अजूनही न्याय मागत फिरत आहेत. त्यातही अमेठीतून पळ काढत, त्यांनीदेखील वायनाडचा आधार घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्येच इतकी गुंतागुंत असताना, ममतांनी आपली स्वतंत्र चूल कायम ठेवत, ‘एकला चलो रे’ची हाक दिली.जादवपूर येथून सायोनी घोष यांना उमेदवारी मिळाली. या त्याच घोषबाई, ज्यांनी शिवलिंगाला निरोध घातल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ‘सीएए’विरोधी ‘पीएफआय’च्या रॅली प्रकरणात नाव आलेला अबू ताहीर खान याला ममतांनी मुर्शिदाबादमधून तिकीट दिले. लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारणार्‍या, महुआ मोईत्रा यांनाही कृष्णानगरमधून उमेदवारी मिळाली. त्यामुळे हिंदूविरोध करणार्‍यांना ममतांनी बक्षीस स्वरुपात लोकसभेची उमेदवारी देऊ केली आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांचा बहरामपूर लोकसभेत युसूफ पठाणशी सामना असेल. या जागेहून अधीर १९९९ पासून खासदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र, ममतांनी त्यांच्या वाटेत युसूफ पठाण नावाचा काटा पेरुन अधीर यांचा ‘खेला’ केला आहे.हा कधी काळी क्रिकेटर राहिलेला युसूफ मूळ बंगालचा नसून गुजरातचा. त्यामुळे गुजराती लोकांचा तिटकारा असलेल्या, ममतांनी शेवटी गुजरातीलाच उमेदवारी दिली. बहरामपूर लोकसभा क्षेत्रात तब्बल ५२ टक्के मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळेच ममतांनी या जागेवर मुस्लीम उमेदवार दिला. यावेळी भाजपने या ठिकाणी निर्मल कुमार साहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार, हे मात्र नक्की.

 
केजरीवालांचा तोल गेला...


विपश्यना, योग, प्राणायाम याने मनुष्य शांत, संयमी होतो. मात्र, केजरीवालांना हे लागू होत नाही. कारण, ते विपश्यनेला शुद्ध मनाने नाही, तर चक्क ’ईडी’ने पाठविलेल्या समन्सला दांडी मारता यावी, यासाठी गेले होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांचा मानसिक तोल ढासळत आहे. समन्सवर समन्स ‘ईडी’ पाठवत असताना, केजरीवाल त्याकडे दुर्लक्ष करताहेत. मात्र, लोकसभा निवडणुका आणि त्यासाठीचा प्रचार याकडे त्यांचे बरोबर लक्ष. दिल्लीतील जागावाटपही त्यांनी उरकून घेतलं. मात्र, पंजाबमध्ये स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. म्हणजेच दिल्लीकर आपल्याला वैतागले आहेत, हे त्यांना कळून चुकलेले. त्यामुळे काँग्रेसच्या बुडत्या टेकूचा त्यांनी आधाराला घेतला. त्यात आता मतं मागण्यासाठी केजरीवालांनी भलताच नियम मांडला. आपण दिल्लीमध्ये विकास कमी आणि दिल्लीला भकास करण्यात अधिक परिश्रम घेतले, हे दिल्लीकर चांगले ओळखून आहे. त्यामुळेच आता केजरींनी महिलांकडे ‘इमोशनल कार्ड’ खेळण्यास सुरुवात केलेली दिसते. ’मोदी मोदी’ म्हणणार्‍या पतीला रात्रीचे जेवण देऊ नका, असा अजब सल्ला केजरीवाल महाशयांनी दिला. एवढ्यावरच न थांबता, ”महिलांनी मला मत देण्याची पतीला शपथ द्यावी, जोपर्यंत ते मानणार नाही, तोपर्यंत जेवायला देऊ नका. त्याचबरोबर महिलांनी त्यांच्या मुलांनाही शपथ द्यावी की, ते केजरीवाल यांनाच मतदान करतील,” असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील ’महिला सन्मान’ कार्यक्रमात महिलांना हे अनोखे सल्ले त्यांनी दिले. ”फक्त तुमचा भाऊ केजरीवाल तुमच्या पाठीशी उभा राहील, असे भाजपला पाठिंबा देणार्‍या इतर महिलांना सांगा,” असेही त्यांनी महिलांना सांगितले. ”मी तुमची वीज मोफत केली, बसची तिकिटे मोफत केली आणि आता मी महिलांना दरमहा एक हजार रुपये देत आहे,” असे उपकाराचे बोलही बोलून दाखवले. मतं मिळविण्यासाठी आता केजरीवालांनी पती-पत्नी, आई-मुलगा या नात्याचीही थट्टा उडविली. महिलांना मोफत प्रवास आणि दर महिना एक हजार रूपये दिले म्हणून महिलांनी आपल्या पतीला आणि मुलाला भाजपला मत देऊ नका अशा शपथा घालायच्या, हा कुठला प्रकार? हा तर विक्षिप्तपणाच म्हणावा लागेल! कथित दारू घोटाळ्यात ज्यांचे नाव आहे, अशा माणसासाठी का म्हणून कुणी शपथांचा खेळ करत बसेल?


Powered By Sangraha 9.0