मुंबई (विशेष प्रतिनिधी): केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथून हिरकणी (hirkani) या नव्या प्रजातीच्या टाचणीचा शोध लावण्यात आला आहे. पुण्यातील एम.आय.टी वर्ल्ड पिस युनिवह्रर्सिटीच्या पाच संशोधकांनी हा शोध लावला असून हा किटक टाचणी या प्रवर्गात मोडतो. तिरुवनंतपुरमच्या पोनमुडी हिल्स या दुर्गम भागातील पर्वतीय प्रदेशातून या टाचणीचा शोध लावण्यात आला असून या टाचणीचे वैज्ञानिक नाव फायलोनेउरा रुपेस्ट्रीस असे आहे.
या संशोधनात डॉ. पंकड कोपर्डे, विवेक चंद्रन, सुबीन जोस, रेजी चंद्रन आणि सुरज पलोदे यांचा समावेश आहे. हिरकणीच्या गोष्टीला साजेशी ही टाचणी अतिशय दुर्गम भागात पर्वतातून उगम पावणाऱ्या झऱ्यांच्या इथे आढळून आली, त्यामुळे या टाचणीला इंग्रजीमधे क्लिफसाईड बांबूटेल आणि मराठीत हिरकणी टाचणी असेनामकरण करण्यात आले आहे. या नव्याने शोधलेल्या प्रजातीचा शोधनिबंध अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या इंटरनॅश्नल जर्नल ऑफ ओडॅनाटोलॉजीमधून प्रकाशित करण्यात आला आहे.
“फायलोनेउरा कुळातील एक नविन प्रजात म्हणजेच हिरकणी टाचणीचा शोध, हा फार महत्त्वाचा शोध आहे. या कुळात आजवर मिरिस्टीका बांबूटेल (फायलोनेउरा वेस्टरमनी) ह्या एकाच प्रजातीची नोंद होती. हिरकणी टाचणीच्या शोधाने आता या कुळात अजून एका प्रजातीची भर पडली आहे. संशोधकांसाठी ही आनंदाची बातमी नक्कीच आहे, पण ह्याचे सरंक्षण करणे ही आपलीच जवाबदारी आहे.”
- डॉ. पंकज कोपर्डे
संशोधक
"जैवविविधतेने समृद्ध प्रदेशातून सापडलेली ही तिसरी ओडोनेट प्रजाती आहे. पश्चिम घाटातील अगस्त्यमलाई टेकड्यांचा एक भाग असलेल्या पोनमुडी येथे पर्यटकांचा वावर असतो. नव्याने सापडलेल्या प्रजातीला विशिष्ट सूक्ष्म निवासस्थानाची आवश्यकता आहे आणि त्यांच्या अधिवासातील बदल आणि जल प्रदूषणामुळे ह्या प्रजातीवर परिणाम होऊ शकतो. कीटकांची लोकसंख्या
जागतिक स्तरावर कमी होत आहे आणि नवीन प्रजातींच्या शोधामुळे आपल्याला त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे लक्षात घ्यायला हवे.”
- विवेक चंद्रन,
संशोधक
“फायलोनेउरा या कुळामध्ये मिरिस्टिका बांबूटेल आणि आत्ता नव्याने शोधलेली फायलोनेउरा रुपेस्ट्रीस अशा दोन प्रजातींचा समावेश आहे. या दोन्हीही प्रजाती पश्चिम घाटापुरत्याच प्रदेशनिष्ठ असून संशोधकांच्या निरिक्षणातून ही टाचणी झऱ्यांच्याकडेला असणाऱ्या खडकांवरील शेवाळांवर अंडी घालते. त्यामुळेच या टाचणीच्या प्रजननासाठी तसेच संवर्धनासाठी अशाप्रकारचे सुक्ष्म अधिवास संरक्षित करणे ही महत्त्वाचे आहेत”, अशी माहिती संशोधक डॉ. पंकज कोपर्डे यांनी दिली आहे.
या प्रजातीला का म्हणतात बांबुटेल ?
फायलोनेउरा या कुळातील टाचण्यांना (कीटकांना) बांबूटेल असे म्हटले जाते. कारण, बांबूवर असणाऱ्या खुणांसारख्या खुणा त्यांच्या शेपटीवर असतात. त्यामुळेच या प्रजातींना बांबूटेल असे म्हंटले जाते.