रत्नागिरीतील कासव विणीच्या किनाऱ्यांमध्ये भर; 'या' किनाऱ्यांवर सापडली नव्याने घरटी

01 Mar 2024 15:20:38
रत्नागिरीतील ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या वीणीच्या किनाऱ्यांमध्ये तीन नव्या किनाऱ्यांचा समावेश. कासव संवर्धन मोहिमेचे यश... 

olive ridle


मुंबई (विशेष प्रतिनिधी): 
रत्नागिरीतील कासव विणींच्या किनाऱ्यांंमध्ये भर पडली आहे. (Olive Ridle) सध्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या कासव विणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन किनाऱ्यांवर पहिल्यांदाच कासवाची घरटी आढळली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत कासवांची विण होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या १७ झाली आहे. (Olive Ridle)


महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. यंदा ऑलिव्ह रिडले कासवांनी रत्नागिरीतील काही किनाऱ्यांना नव्याने जवळ करत भाट्ये, रोहिले आणि वरवडे किनाऱ्यांवर घरटी केली आहेत. यापूर्वी या किनाऱ्यांवर कासवाची घरटी आढळत नव्हती. रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले (Olive Ridle) कासवांच्या विणीचे १४ किनारे होते, आता त्यामध्ये नव्याने आणखी ३ किनाऱ्यांची भर पडली आहे. भाट्ये किनाऱ्यावर आठवड्याभरापूर्वी एक घरटे आढळले होते. या घरट्याच्या संरक्षणासाठी त्यामधील १०८ अंडी गावखडीच्या किनाऱ्यावर हलविण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी या किनाऱ्यावर (Olive Ridle) कासवाचे दुसरे घरटे आढळले. त्यामुळे आता भाट्ये किनाऱ्यावर हॅचरी करुन त्याठिकाणीच अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.
वरवडे किनाऱ्यावर ही चार घरटी आढळली असून त्यांना स्थानांतरित न करता त्यांचे त्याठिकाणी इन-सेटू करण्यात आले आहे.  चिपळूण तालुक्यातील रोहिल किनारी तीन ते चार घरटी आढळली असून या घरट्यातील अंडी तवसाळ या किनाऱ्यावर हलविण्यात आली आहेत. वन विभागाने या अंड्यांच्या संरक्षणासाठी हे स्थानांतरण केले असून कासव विणीच्या किनाऱ्यांमध्ये सातत्याने होणारी वाढ हे रत्नागिरीतील कासव संवर्धन मोहिमेचे यश असल्याचे, रत्नागिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले. 

Powered By Sangraha 9.0