कोण आहे मॉरिस भाई? ज्याने केली घोसाळकरांची हत्या

09 Feb 2024 14:58:31

Moris Bhai



मुंबई
: अभिजीत घोसाळकर यांच्याबद्दल कायमच घृणा असणाऱ्या मॉरीस नरोन्हा उर्फ मॉरीस भाईने पूर्ववैमनस्यातून घोसाळकर यांची हत्या केली. "माझं आयुष्य बरबाद करणाऱ्या अभिषेक घोसाळकरला मी सोडणार नाही!", अशी सतत वक्तव्ये करत असल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली आहे. यापूर्वीही घोसाळकर यांच्या पत्नी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने मॉरीस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नगरसेविका घोसाळकरांनी महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही म्हटले होते.

मॉरीस नोरोन्हा हा स्वतःला समाजसेवक आणि नेता म्हणवून घेतो. त्याने स्वतःचे maurisbhai.com हे संकेतस्थळही सुरू केले होते. २००५ पासून तो गोरगरीबांना मदत करत असल्याचा दावा या वेबसाईटवर करतो. बोरिवली-दहीसर या परिसरात तो मदत करायचा. मदतीसाठी तो इतरांकडून पैसे घेत नव्हता तर स्वतःचा पैसा खर्च करायचा असा दावाही तो करतो. 'सामना' या वृत्तपत्रातील माहितीनुसार, कफ परेड ते शिर्डी हा ११५ दिवसांचा मदत यज्ञ तो करत होता. त्याने पाच लाखांहून अधिक जणांना मदत केल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे.

सामनातील वृत्तपत्रातील बातमीनुसार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असण्याचे कौतूकही त्यांनी केल्याच्या बातम्या आहेत. "मुख्यमंत्री हो तो उद्धव ठाकरे जैसा", अशा मथळ्या खाली हिंदी वृत्तपत्र 'दोपहर का सामना'तून कौतूक करणारी बातमी दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसालाही मॉरीसने गरजूंना मदत केल्याचा दावा करणारी बातमी सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांच्या पूर्ववैमनस्यातून हा प्रकार उघडकीस आला होता. उद्धव ठाकरे गटातून नगरसेवक आणि आमदारकीच्या तिकीटासाठी सुरू असलेली चढाओढ या हत्येला कारणीभूत ठरत आहे. घोसाळकर यांच्यामार्फत मॉरीसला एका गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याने हा बदला घेतल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

कशी झाली हत्या?

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बोरिवली परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा, असे आरोपीचे नाव असून, त्यानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयाला गुरुवारी भेट दिली. या भेटीदरम्यान मॉरिस याने फेसबुक लाईव्ह करीत त्यांना बोलण्याचे आवाहन केले. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिसने अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. पैकी तीन गोळ्या लागल्याने त्यांना बोरिवली येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, मॉरिस नरोन्हाने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवरही ४ गोळ्या झाडत आत्महत्या केली. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'मॉरिसच्या नावे ही व्यक्ती बोरिवली आणि दहिसर परिसरात ओळखली जायची. एका वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


Powered By Sangraha 9.0