पिंगुळी लोककलेचा ठाकर कलाकार

09 Feb 2024 20:53:58
Ganpat Masge

फाटक्या संसाराला ठिगळांची जोड देत, त्यांनी लोककलेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. विशेषतः पिंगुळी लोककला त्यांनी देशभरात पोहोचवली. जाणून घेऊया सिंधुदुर्गातील गणपत मसगे यांच्याविषयी...
 
सिंधुदुर्ग येथील पिंगुळी गाव सध्या ओळखलं जातंय, लोककलाकार गणपत मसगे यांच्यामुळे. त्याला कारणही तसेच. नुकताच त्यांना ’संस्कार भारती’तर्फे दिला जाणारा ‘भरतमुनी पुरस्कार’ रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गणपत यांचे वडील सखाराम मसगे मोलमजुरी आणि विविध ठिकाणी लोककला सादर करून घर चालवत. गणपत यांच्या वडिलांना राज्य शासनाची फेलोशिपदेखील मिळाली होती. चित्रगती, कळसुत्री, शॅडो पपेट अशा जवळपास ११ लोककला ते सादर करत. कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे दरवर्षी हमखास त्यांचा कार्यक्रम असायचा. प्राथमिक शिक्षण घेत असताना गणपत दशावतार सादर करत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत. कार्यक्रम असला तर शाळेला दांडी ठरलेली. गणपत यांनी इयत्ता नववी अनुत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडून दिली. पुढचा प्रवास प्रचंड हलाखीचा होता. गणपत यांनी संपूर्ण लक्ष लोककलेवर केंद्रित केले.

पुढे वसंतराव गंगावणे अमेरिकेहून शिक्षण घेऊन गावात आल्यानंतर, त्यांनी लोककला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ’गोकुळ प्रकल्प प्रतिष्ठान’ची स्थापना केली. १९७८ साली कला संचालनालयाने पिंगुळीच्या चित्रगतीवर राज्य शासनाची दिनदर्शिका काढली. गंगावणे यांनी गावात वस्तुसंग्रहालय उभारलं. गणपत आणि त्यांचे वडील सखाराम, आत्माराम मसगे, लाडोबा पालवे अशा चौघा जणांनी ’युनियन बँके’च्या प्रचारार्थ राज्यभर कार्यक्रम केले. वस्तुसंग्रहालयात लोककलेविषयक विविध साहित्य गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्या वडिलांना दिली, तर माहिती सांगायची जबाबदारी गणपत यांच्याकडे. दरम्यान, मुलगी आजारी असल्याने, संस्थेकडे पैसे मागितले, तेव्हा गणपत यांना नकार दिला गेला. त्यानंतर त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली. ठाकर समाज असल्याने ‘पिंगुळीची लोककला’ असे नाव पुढे प्रचलित झाले. घरालाच त्यांनी लोकभवनमध्ये रुपांतरीत करत, मुलांना लोककलेचे धडे देण्यास सुरुवात केली.

’दयती लोककला संवर्धन अकादमी’ची स्थापना करत, लोककलेचा प्रचारप्रसार करण्यास सुरुवात केली. ‘ठाकरवाडी म्युझिम’ची स्थापना केली, यात ११ लोककलेच्या प्रकारांची माहिती व सर्व साहित्य पाहायला मिळते. वडिलांच्या समाधीस्थळी त्यांनी जुन्या शेती अवजारांचे कृषी संग्रहालय उभे केले. ठाकर समाज व त्यांच्या संस्कृतीची माहितीदेखील या ठिकाणी मिळते. कोकणातील दशावतार संग्रहालयाचे कामही प्रगतिपथावर आहे. १९८४ साली ‘अपना उत्सवा’त तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर गणपत यांनी आपली लोककला सादर केली. २००५ साली ‘संगीत नाट्य अकादमी पुरस्कार’ तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला. मागील वर्षी राज्य शासनाचा ‘आदिवासी गिरीजन पुरस्कार’देखील मिळाला.

चित्रगती, कळसुत्री, पोवाडा, गोंधळ, लेदर पपेट, पोतराज, राधानृत्य, पिंगळा अशा विविध लोककलांसाठी मसगे यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. शिवदासकुमार आणि बाळकृष्ण ही दोन्ही मुले त्यांच्या लोककलेचा वारसा पुढे नेत आहेत. बाळकृष्ण याने जे. जे. स्कूलमधून सेट डिझाईनिंग केले. कोरोना काळात बाळकृष्ण घरी आला आणि त्यावेळेस त्याने पूर्ण वेळ लोककलेसाठी देण्याचे ठरवले. मुंबईला न जाता, त्याने वडिलांसोबतच काम करण्यास सुरुवात केली. “लोककला ही आपली संस्कृती आहे, ती आपण जीवंत ठेवली पाहिजे. मसगेंसारख्या आदिवासी लोकांनी आपली आदिवासी संस्कृती जतन केल्यानेच आज आम्ही भारतीय आहोत,” अशा शब्दांत रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मसगे यांचे कौतुक केले.

‘स्वच्छ भारत अभियान’, ‘रामायण-महाभारत,’ ‘सावरकर देशभक्ती’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ अशा विविध विषयांवर मसगे हे लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. वडिलांनी गणपत यांना लोककलेचे बाळकडू पाजले. परंतु, लाडोबा पालवे यांनी बाहुली नाचविण्याचे ज्ञान आणि तंत्र शिकविले. कथानकाचे ज्ञान आत्माराम मसगे यांनी दिले. त्यानंतर गणपत हे बाहुले बनवणे, नाचवणे, खेळ करणे यात पारंगत झाले. अनेकदा गणपत हे व्याजावर पैसे काढून, कार्यक्रमाला जात असे. मुलगा शिक्षणासाठी मुंबईला गेला, तेव्हा जाताना तेव्हा त्याला त्यांनी अक्षरशः कर्ज काढून मोबाईल घेऊन दिला.“सुधारणा झाल्याच पाहिजे; पण संस्कृती टिकविण्याला प्राधान्य द्यायला हवे. सध्या आपण आपल्या संस्कृतीकडून दुसर्‍या संस्कृतीकडे वळतोय, हे थांबवले पाहिजे. बाहुला शिवला तर बर्‍याचदा कपडा आणण्यासाठी पैसे नसायचे. मग जुने, फाटलेले कपडे बाहुल्याला शिवायचे. कार्यक्रम नेहमी मिळत नाही, त्यामुळे लोककला जपणे आणि सादर करणे ही सोपी गोष्ट नाही,” असे गणपत सांगतात.आपला फाटका संसार असूनही, त्याला ठिगळांची जोड देत, गणपत यांनी लोककलेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. विशेष म्हणजे, पिंगुळी लोककला त्यांनी देशभरात पोहोचवली. लोककलेसाठी अव्याहतपणे झटणार्‍या लोककलाकार गणपत मसगे यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

- पवन बोरस्ते



Powered By Sangraha 9.0