तरुण नेत्याची हत्या हा गंभीर विषय, याला राजकिय रंग देऊ नका

09 Feb 2024 12:11:05
fadanvis on ghosalkar mureder
 
मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बोरिवली परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा असे आरोपीचे नाव असून, त्यानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रीया दिली आहे.
 
घोसाळकरांची हत्या झाल्यानंतर उबाठा गट आणि नेत्यांकडुन गृहमंत्र्यांना या विषयांवरुन कोंडीत पकडण्याच्या प्रयत्न केला गेला. त्यावर गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दर्शवली आहे. "अभिषेक घोसाळकर यांच्यासंदर्भातील घटना अतिशय गंभीर आहे. एका तरुण नेत्याची हत्या ही एक दुःखद घटना आहे. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करु नये" अस ते म्हणाले.
 
पुढे त्यांनी म्हटलं की "अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा हे एका पोस्टरवर अनेकदा झळकले आहेत. त्यांनी अनेक वर्षे सोबत काम केलं आहे.त्यामुळे कोणत्या विषयातुन त्यांच्यात बेबनाव झाला आणि हा विषय हत्येपर्यत गेला याची चौकशी केली जात आहे. यातील पोलिस तपासात समोर येणाऱ्या गोष्टी योग्य वेळ आली की समोर ठेवण्यात येतील"
 
"ही घटना वैयक्तीक वैमनस्यातुन घडलेली आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी विधाने विरोधकांनी करु नयेत. या प्रकरणात बंदुक आणि तिचा परवाना होता का अशे प्रश्नही आहेत त्यासंबंधीतही योग्य कारवाई केली जाईल" असही त्यांनी सांगितले आहे.
 
दरम्यान, मॉरिस नरोन्हाने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवरही ४ गोळ्या झाडत आत्महत्या केली. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'मॉरिसभाई' या नावाने ही व्यक्ती बोरिवली आणि दहिसर परिसरात ओळखली जायची. एका वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Powered By Sangraha 9.0