राज्याच्या विकासाला उद्धव ठाकरे, शरद पवारांसह ‘आंदोलनजीवीं’चा विरोध

09 Feb 2024 22:45:51
Devendra Fadnavis

नवी दिल्ली : “महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक प्रकल्पांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्राणपणाने विरोध केला. तरीदेखील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, देशाच्या विकासात अडथळा आणणार्‍या ‘आंदोलनजीवीं’ची इकोसिस्टीम तोडण्याचीच गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित सुशासन परिषदेतील मुलाखतीत ते बोलत होते.

“महाराष्ट्रामध्ये आज ‘अटल सेतू’, ‘समृद्धी महामार्ग’ असे अनेक प्रकल्प आज आकारास येत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा आणि सहकार्य नेहमीच मिळत असते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे राज्यातील व्यवस्थेत सकारात्मक सुधारणा घडवून विकासाचा वेग वाढवला आहे. मात्र, ‘समृद्धी महामार्ग’ असो अथवा नाणारचे प्रकल्प असो; या प्रकल्पांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोठा विरोध केला होता. अर्थात, विकास प्रकल्पांना विरोध करण्याची ‘आंदोलनजीवी’ इकोसिस्टीम देशात आज उभी राहिली आहे. प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधात हीच मंडळी कार्यरत असतात, त्यांना त्यासाठी पैसाही एकाच ठिकाणाहून येतो. त्यामुळे अशी विकासविरोधी तोडून टाकणेच गरजेचे आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनाचे नवे मॉडेल जनतेपुढे मांडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “सरकारी यंत्रणेविषयी विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. लोककल्यणाकारी योजना कशा राबवाव्यात, याचा आदर्श वस्तुपाठ देशात निर्माण झाला आहे. सरकारी योजनांचे लोकशाहीकरण करण्यावर पंतप्रधानांचा विशेष भर असतो. परिणामी, योजना जाहीर केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेस मिळण्यास प्रारंभ होतो, त्यामुळे देशात सुशासनाचे पर्व सुरू झाल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.”

Powered By Sangraha 9.0