लोकरंजनासोबतच प्रबोधनाचा एकनाथांचा आदर्श अनुसरावा!

08 Feb 2024 18:40:26
Raj Dutt On Vivek Films

मुंबई
: “संत एकनाथांनी अभंगरचनांसोबतच अनेक भारुडेसुद्धा लिहिली. कारण त्यांच्या सादरीकरणातून लोकांच्या मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा हेतूही साध्य होतो. आता विवेक फिल्म्सने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना संत एकनाथांचा हाच आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, ” असे उद्गार चित्रतपस्वी पद्मभूषण राजदत्त यांनी काढले. विवेक समूहातील ‘दुर्दम्य लोकमान्य’ व ‘कालजयी सावरकर’ या दोन लघुपटांच्या निर्मितीनंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी सुरू झालेल्या ‘विवेक फिल्म्स’ या नव्या आयामाच्या अंधेरी पश्चिम येथील कार्यालयाच्या शुभारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. राजदत्त यांना भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याचे औचित्य साधून विवेक समूहाच्या वतीने मुंबई महानगर मा. संघचालक सुरेशजी भगेरिया आणि कोकण प्रांताचे प्रचार प्रमुख अजयजी मुडपे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या छोट्याशा आटोपशीर कार्यक्रमात विवेक फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत शितोळे यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमासे संस्कारभारतीचे कोकण प्रांत संघटनमंत्री उदय शेवडे, कोकण प्रांत चित्रपट आयाम संयोजक संदीप पाटील तसेच या क्षेत्राशी संबंधित श्रीकांत केकरे व अदिती दधिच आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर व कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर आणि भालिवली प्रकल्पाचे संचालक प्रदीपजी गुप्ता व व्यवस्थापक लुकेश बंड हेसुद्धा उपस्थित होते. साप्ताहिक विवेकचे कार्यकारी प्रमुख राहुल पाठारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व समूहाचे मुख्य लेखापाल आदिनाथ पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
 
या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात राजदत्त यांनी आपल्या काही जुन्या प्रेरक आठवणींनाही उजाळा दिला. जेव्हा आपण चित्रपट क्षेत्रात कार्य करायचे की नाही? असा प्रश्न राजदत्त यांच्या मनात उभा राहिला तेव्हा त्यांनी वर्धा येथील मा. संघचालक अप्पाजी जोशी यांना पत्र लिहून त्यांचा सल्ला मागितला होता. त्यावेळेस अप्पाजींच्या सांगण्यावरून नंतरच्या काळात संघाचे प.पू. सरसंघचालक झालेल्या बाळासाहेब देवरस यांनीच राजदत्त यांना पत्र लिहून त्यात अशी विचारणा केली होती की, आपण चित्रपट क्षेत्रात कार्य करावे की नाही? असा प्रश्नच त्यांच्या मनात कसा उभा राहू शकतो. कारण संघाच्या स्वयंसेवकाने समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात पदार्पण केले पाहिजे आणि तेथे लक्षणीय कार्यसुद्धा करून दाखविले पाहिजे, मात्र आपण संघाचे स्वयंसेवक आहोत या गोष्टीचा आपल्या मनाला कधीही विसर पडू देऊ नये, हाच संघाचा विचार असल्याचेही या पत्रातून स्पष्ट केले होते. त्यानुसार राजदत्त यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. पुढे त्यांनी चित्रपट दिग्दर्शन व अन्य संबंधित कामांमुळे थेट या क्षेत्रातील लक्षणीय योगदानासाठी अनेक पुरस्कारांच्या सोबतच ‘पद्मभूषण’ या सन्मानापर्यंत मजल मारली, हे सर्व रसिक जाणतातच!

Powered By Sangraha 9.0