भोपाळ : मध्य प्रदेशातील दमोहमध्ये कट्टरपंथी जमावाने चार तरुणांची हात, पाय आणि डोकी कापण्याची धमकी दिली. पोलिसांसमोर कट्टरपंथी जमावाने ही धमकी दिली. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांशीही गैरवर्तन करण्यात आल्याने चांगलाच गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये शेकडो कट्टरवाद्यांच्या जमावामध्ये इन्स्पेक्टर आनंद सिंह ठाकूर निर्भयपणे जमावाला इशारा देताना दिसत आहेत.
संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेशातील दमोह येथील आहे, जिथे दि. ३ फेब्रुवारी २०२४ चार तरुणांचा अन्सार खान नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. हा वाद पाहून एक इमाम हाफिज रिझवान खान येथे पोहोचला. तरुणांचे कपडे वेळेवर शिवले गेले नाहीत, यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात आले. या वादादरम्यान हाणामारी झाल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे.
अन्सार खान यांच्यासह इमाम हाफिज रिझवान खान यांनाही मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इमामची बाईक फोडल्याचा आरोपही जमाव त्या तरुणांवर करत आहे. शेवटी अन्सार खान आणि इमाम यांनी ही बाब जवळच्या पोलीस ठाण्यात कळवली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी या तरुणांवर कारवाई केली तोपर्यंत इमामला मारहाण झाल्याची अफवा शहरभर पसरली होती. यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याबाहेर शेकडो मुस्लिमांचा जमाव जमला. त्यांना २४ तासांत अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. यावेळी जमावाने पोलीस आणि हिंदूंना धमक्या देण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अक्रम रैन या व्यक्तीने येथे लाऊडस्पीकर लावून जमावाला भडकावण्यास सुरुवात केली. तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्हीच त्यांचे हातपाय कापू, असे तो म्हणाला. यावेळी तरुणांचे शिरच्छेद करण्याची धमकीही त्यांनी दिली. जमावाने आक्षेपार्ह धार्मिक घोषणा देण्यास सुरुवात केली. एसएचओ आनंदसिंग ठाकूर यांनी जमावाला चेतावणी दिली आणि गोंधळ घालणाऱ्या कट्टरपंथी जमावाला शांत राहण्याचा इशारा दिला आणि हात पाय कापण्याची धमकी दिली. या संपूर्ण घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.