"घरं फोडणाऱ्या पवारांबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही!"

08 Feb 2024 13:58:54

Sharad Pawar


मुंबई :
घरं फोडणाऱ्या शरद पवारांबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही, अशी टीका मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं. यावर आता प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 
 
प्रकाश महाजन म्हणाले की, "शरद पवारांनी ४६ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय स्वार्थापोटी आपले वरिष्ठ नेते स्वर्गिय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे निवडणुक आयोगाचा निकाल हा शरद पवारांच्या काळजात कट्यार घुसवणाराच निघाला, असं मला वाटतं. ती कट्यार अजित पवारांनीच घुसवावी यासारखा दुर्दैव नाही."
 
ते पुढे म्हणाले की, "शरद पवारांनी आपल्या राजकीय आयुष्यात अनेक पक्ष फोडले, अनेक संस्था फोडल्या आणि अनेक नाती तोडली. त्यांनी काका-पुतण्यामध्ये, मामा-भाच्यामध्ये भांडण लावलं. शरद पवारांनी आयुष्यभर शाहु-फुले-आंबेडकरांचं नाव घेतलं पण, या महाराष्ट्रात जातीवादाला त्यांनीच खतपाणी दिलं. आज जातीजातींमध्ये होणारी भांडणं ही शरद पवारांच्या राजकारणाचं फलित आहे. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष त्यांच्या हातून निसटला याबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. शरद पवार सहानुभूती बाळगण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी आयुष्यभर जे पेरलं तेच उगवलं आणि तेच त्यांना कापावं लागेल," असेही ते म्हणाले.





Powered By Sangraha 9.0