देशाच्या विकासासाठी समान नागरी कायदा आवश्यक!

08 Feb 2024 19:34:04

Indresh Kumar
(Indresh Kumar on UCC)

जयपूर : "देशाच्या विकासासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. समान नागरी कायद्याने कोणाच्याही स्वातंत्र्यावर बंधन नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या लोकांचे स्वातंत्र्य संपुष्टात येणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये समानतेची भावना निर्माण होईल आणि परस्पर समंजसपणा आणि सद्भावना वाढेल.", असे प्रतिपादन मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केले.

जयपूरच्या मालवीय नगरातील पाथेय भवनच्या महर्षी नारद सभागृहात बुधवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच (राजस्थान चॅप्टर) च्या वतीने 'एक देश, एक कायदा' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. उत्तराखंड सरकारने घतलेल्या निर्णयाचे उत्तराखंडमध्ये त्यांनी यावेळी केले आहे.

इंद्रेश कुमार यावेळी म्हणाले, "चार वेळा लग्न करा असे इस्लाममध्ये कुठेही लिहिलेले नाही. जो असे खोटे पसरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो तो एकप्रकारे गुन्हा करत आहे. या प्रकरणात सुन्नत आणि कुराण अगदी स्पष्टपणे सांगते की संमतीशिवाय कोणीही पुन्हा लग्न करू शकत नाही. देशात कुठलीही गोष्ट लागू झाली तरी मुस्लिमांचे काय होणार, असा प्रश्न का पडतो? भारतीयांचे काय होईल असे कोणी का म्हणत नाही? स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी असे विचार करणारे मुस्लिम अजून भारतीय झाले नाहीत. जोपर्यंत ते असेच राहतील, तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे."

पुढे ते म्हणाले की, "जगात असा कोणताही देश नाही जो सर्वांना स्वीकारतो. भारत हा एकमेव देश आहे ज्याने सर्व धर्म आणि जातींना स्थान दिले आहे आणि त्यांना उत्कर्षाचा मार्गही दिला आहे. त्यामुळे भारतच ती भूमी, भारतच तो समाज आहे आणि भारतीयत्वच ते चिंतन आहे, जी जगात अपवाद आहे."

Powered By Sangraha 9.0