गोठिवलीमध्ये 'गाव चलो अभियाना'ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

08 Feb 2024 13:32:55

Ganesh Naik


मुंबई :
भारतीय जनता पक्ष, नवी मुंबईच्यावतीने 'गाव चलो अभियानांतर्गत' आमदार गणेश नाईक यांनी गोठवली गावातील अभियानाचा प्रवास सुरू केला. या प्रवासाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत आमदार नाईक यांनी विविध सामाजिक घटकांच्या आणि संस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
लोकनेते आमदार नाईक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन यांनी गाव चलो अभियानाची सुरुवात केली. महापालिकेच्या शाळा क्रमांक ४६ ला भेट देऊन तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर संवाद साधला. यानंतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टर, वकील यांच्या भेटी घेतल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, गुणवंत विद्यार्थी, स्थानिक प्रतिष्ठित, उद्योजक, व्यापारी, दुकान व्यवसायिक, सहकारी संस्था, फेरीवाले, भाजी विक्रेते अशा सर्व घटकांसोबत मनमोकळा संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झालेल्या दमदार विकास कामांची माहिती सांगणारी पत्रके त्यांना दिली.
 
यावेळी त्यांनी जनसंघाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते यांच्या भेटी देखील घेतल्या. या भेटीदरम्यान ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमदार नाईक यांनी अंगणवाडीला भेट देत तेथील अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. अभियानाच्या पहिल्या सत्राच्या शेवटी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या बूथ कमिटीच्या बैठकीमध्ये बूथ स्तरावर करावयाच्या कामांची माहिती उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच आमदार नाईक यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा, बचत गटातील महिलांचा आणि अन्य घटकांचा सन्मान करण्यात आला.
 
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकनेते आमदार नाईक यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये देश समृद्ध झाल्याचे सांगून चांगले विचार आणि संस्कार समाजात रुजल्याचे सांगितले. सत्तेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी जनतेची सेवा केली. गाव चलो अभियान देशावर प्रेम करायला शिकवते असे नमूद करून सर्वांनी माणुसकी धर्माचे जतन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान संपूर्ण देशामध्ये खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर, विभागा विभागात राबविण्यात येते आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. १९९५ पासून नवी मुंबईच्या सेवेमध्ये असून येथील जनतेने आमच्यावर आजतागायत अजोड विश्वास कायम ठेवलेला आहे, असेही ते म्हणाले.
 
या अभियानाबद्दल माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार नाईक यांनी म्हणाले की, "पंतप्रधान मोदी यांनी विविध लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देशातील जनतेला जगण्याचा आत्मविश्वास दिला. निर्भयपणे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य जनतेला मिळाले. विविध विकास योजनांचा लाभ समाजातल्या अंत्योदय घटकापर्यंत पोहोचला. देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. अवकाश संशोधन, आरोग्य, गरिबी निर्मुलन, सार्वजनिक स्वच्छता, वैद्यकीय उपचार, उद्योग, व्यापार, रोजगार, शिक्षण, समाज कल्याण अशा सर्वच क्षेत्रामध्ये भरीव काम झाले आहे. विकसित राष्ट्र म्हणून भारताची जडणघडण होत असून सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासीयांना अभिमान वाटतो."




Powered By Sangraha 9.0