राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेणार नाही!

07 Feb 2024 19:53:56
Rahul Narwekar On ncp mla disqualification
मुंबई - राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी दिली.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावेळी विधानसभा अध्यक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडील घटनेचा आधार घेतला होता. राष्ट्रवादीबाबतही तसेच धोरण अवलंबले जाईल का, असा सवाल विचारला असता नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. सध्या दोन्ही गटांचे युक्तीवाद आणि साक्षीदारांनी नोंदविलेल्या जबाबांचा अभ्यास सुरू आहे. येत्या १४ फेब्रुवारीला सायंकाळी याप्रकरणी निकाल दिला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

Powered By Sangraha 9.0