लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी रियाझ अहमद अटक

07 Feb 2024 12:41:44

Delhi
 
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी इस्लामिक दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी रियाझ अहमद याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. रियाझ अहमद जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याचे काम करत होता आणि कुपवाडा मॉड्यूलचा भाग आहे. त्याला दि. ६ फेब्रुवारी २०२४ मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. रियाझ ३१ जानेवारी २०२३ रोजी भारतीय लष्करातून निवृत्त झाला होता.
 
जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कराच्या काही दहशतवाद्यांना अटक केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी रियाज अहमदला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दहशतवादी रियाझ अहमद, खुर्शीद अहमद राथेर आणि गुलाम सरवर राथेर या दोन दहशतवाद्यांसह नियंत्रण रेषेपलीकडून काश्मीरमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा आणण्याचे काम करत होते.
 
रियाझ हा सीमेपलीकडे बसलेल्या हस्तकांच्या संपर्कात होता आणि काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देत होता, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून पकडलेला दहशतवादी रियाझ अहमद लष्करातून निवृत्त झाला आहे. तो काश्मीरमधील नया गाबरा गावचा रहिवासी आहे. हे गाव कुपवाड्यात आहे. कुपवाडा येथे दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्याच्याबाबतची माहिती समोर आली.
 
काहीदिवसांपूर्वीच कुपवाडामध्ये पाच जणांना मोठ्या प्रमाणात एके-४७ रायफल आणि मॅगझिनसह पकडण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये बसलेल्या मंजूर अहमद शेख आणि काझी मोहम्मद खुशाल या हॅन्डलरने या लोकांना शस्त्रे पाठवली होती. या शस्त्रांद्वारे ते खोऱ्यात दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत होते. रियाझ कुपवाडा दहशतवादी मॉड्युलचा एक भाग आहे, जो हल्ल्याची योजना आखत होता. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0