निवडणुक आयोगाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

07 Feb 2024 12:25:55

Fadanvis


नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणुक आयोगाने दिलेला निकाल हा अपेक्षित निर्णय आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. निवडणुक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचा निकाल दिला. तसेच पक्षाचे नाव आणि चिन्हदेखील अजित पवारांकडे दिले. यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हा अपेक्षित निर्णय आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने निवडणुक आयोगाने जी भुमिका घेतली, ती समाजवादी पार्टीच्या प्रकरणात असो किंवा इतर प्रकरणात असो, प्रत्येक वेळी हे असेच निर्णय दिले आहेत."
 
"शेवटी बहुमत जो निर्णय घेते तो निर्णय लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो. याशिवाय पक्षाच्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे, हेदेखील महत्त्वाचं आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं. तसेच अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल. बहुमताला महत्त्व आहेच. पण यावेळी सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. २०१९ मध्ये ज्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला होता त्यांना लोकशाही काय असते हे आज समजलं आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.





Powered By Sangraha 9.0