निखिल वागळे यांच्या विरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुण्यात गुन्हा दाखल

06 Feb 2024 18:49:15
Sunil Deodhar Filed fir against nikhil Wagle

पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मिडिया एक्सवरून (ट्विटर) विरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रार दाखल केली आहे.

वागळे यांनी जाणीवपूर्वक जातीजातीमध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवाणी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देखील अपमान केला आहे, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वागळे यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि अडवाणी यांच्याविरोधात गरळ ओकणारे विधान केले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदींची प्रतिमा मलीन करण्याच्या तसेच देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वागळे यांनी हे ट्वीट केले आहे. यामुळे सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेला धक्का लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच देशाचे राष्ट्रपती हे जनजातीय समाजातून असून वागळे त्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रपती व भारतरत्न पुरस्काराचा अपमान केला आहे.

जातीयवादी मानसिकतेला पोषक खतपाणी घालून देशभरातील अनुसूचित जाती-जमातींची अवहेलना करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी देवधर यांनी केली.त्यानंतर पोलिसांनी वागळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेअनुसार कलम २९५ (अ), १५३ (अ), ५००, ५०५, ३५३, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(अ), ६७ व अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रार दाखल केली आहे.





Powered By Sangraha 9.0