मेट्रो ६चा कांजूरमार्ग कारशेडसाठी एमएमआरडीएकडून सॅम इंडिया कंपनीची निवड

06 Feb 2024 18:11:55
MMRDA Metro 6 kanjurmarg Carshed
 
मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या माध्यमातून डेपो उभारणीला गती देण्यात येत आहे. सॅम इंडिया या कंपनीची या डेपोच्या बांधकामासाठी निवड करण्यात आली आहे.
 
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए)द्वारे मुंबई मेट्रो लाइन-६च्या कांजूरमार्ग डेपोच्या बांधकामासाठी सॅम इंडिया बिल्ट वेल या कंपनीला सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. मेट्रो ६ ही मार्गिका स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (ईस्टर्न एक्सप्रेस हायवे) दरम्यान १५.३१ किमी लांबीची ही मार्गिका उभारण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु आहे.

एमएमआरडीएच्या २०२० मधील नियोजनानुसार ही मेट्रो ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र कारशेडच्या जागेचा तिढ्यामुळे ही मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी २०२५ उजाडण्याची चिन्हे आहेत. कारण कांजूर येथील जागेचा तिढा सुटला असला तरीही अद्याप डेपोच्या कामासाठीची दीड ते दोन वर्षांचा काळ लागू शकतो, असा अंदाज आहे.
 
एमएमआरडीएने ऑक्टोबर २०२३ मध्ये डेपोच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या होत्या. डेपोच्या बांधकामासाठी ५०८.५७ कोटी इतका खर्च अंदाजित आहे. तर ३० महिन्यांची बांधकाम मुदत आहे. याठिकाणी कर्मचारी निवास आणि मुख्य डेपोचे बांधकाम करण्यात येईल. सॅम इंडिया बिल्ट वेल सध्या भोपाळ मेट्रोच्या सुभाष नगर डेपोमध्ये केईसी इंटरनॅशनल आणि मुंबईत मुंबई मेट्रो लाइन -३च्या आरे येथील कारडेपोची निर्मिती करत आहे.

मेट्रो ६ हा मार्ग पूर्णपणे उन्नत आणि वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणी प्रदान करणारा आहे. या मार्गामुळे मार्ग २अ चे आदर्श नगर,मार्ग-७चे जेव्हीएलआर स्थानक, मार्ग-३चे आरे डेपो स्थानक आणि मार्ग ४चे गांधीनगर स्थानक अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंतरबदल सुविधा मिळेल. या मेट्रो मार्गामध्ये एकूण १३ स्थानके आहेत. मेट्रो ६ प्रकल्पाच्या उभारणीचे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो -६ चे कारडेपो कांजूर येथे प्रस्तावित असून १५ हेक्टर जमिनीचा ताबा प्राधिकरणास प्राप्त झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0