मजार नव्हे लाक्षागृहच! ५३ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हिंदू पक्षाचा विजय

06 Feb 2024 17:34:00

Laaksha
(Baghpat Lakshagruh)

लखनौ :
उत्तर प्रदेशच्या बागपतमधील महाभारताशी संबंधित लाक्षागृहा आणि बदरुद्दीन शाह मजारच्या वादाप्रकरणी न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. हिंदूंना १०० बिघा जमिनीचा (६१.९ एकर) हक्क दिला असल्याचे मंगळवारी बागपत एडीजे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात न्यायालयाने हिंदू पक्षाकडील १० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती. गेली ५३ वर्ष न्यायालयात खटला सुरू होता.
 
सदर प्रकरण १९७० पासून बागपत दिवाणी न्यायालयात सुरू होते. ५३ वर्ष सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी कोर्टातील ८७५ तारखांनंतर पूर्ण झाली. महाभारतात पांडवांचा वध करण्यासाठी याच ठिकाणी लाक्षागृह बांधले होते, अशी पौराणिक मान्यता आहे. पांडवांनी आगीपासून वाचण्यासाठी आश्रय घेतलेली ही प्राचीन गुहादेखील याठिकाणी आहे, असे म्हणले जाते.
 
हस्तिनापूर एएसआय संचालकांच्या देखरेखीखाली १९५२ मध्ये याठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते. दरम्यान ४५०० वर्षे जुनी मातीची भांडी याठिकाणी सापडली होती. पुरातत्व विभागाकडून झालेल्या सर्वेक्षणात महाभारत काळातील काही संस्कृतीचे अवशेषही सापडले आहेत. या लाक्षागृहाजवळ एक गुरुकुल आणि अनेक भव्य यज्ञशाळा असल्याचेदेखील सांगण्यात येत आहेत. सध्या ही जागा एएसआयच्या संरक्षणाखाली असून यूपी सरकारने महाभारत सर्किट अंतर्गत साइट विकसित करण्याची योजना आखली आहे.
 
Powered By Sangraha 9.0