प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांनी कोरले ३ ग्रॅमी पुरस्कारांवर नाव!

05 Feb 2024 11:46:32

zakir hussain 
 
मुंबई : जागतिक पातळीवरील ग्रॅमी पुरस्कार मिळणे म्हणजे प्रत्येक कलावंताला त्याने आजवर केलेल्या कामगिरीला योग्य गौरव जगाच्या पाठीवर मिळाला हे सिद्ध करते. आजवर ग्रॅमी पुरस्कारावर भारतीय कलाकारांनी आपल्या नावावर केले आहेत. यंदाही हा बहुमान भारताला मिळाला आहे. प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या धीस मुवमेंट अल्बमचा ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. याशिवाय जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी आपल्या नावावर ३ ग्रॅमी पुरस्कार कोरले आहेत.
 
 
 
झाकीर हुसैन यांना बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी त्यांच्या पाश्तो नावाच्या अल्बमसाठी गौरवण्यात आले. त्यांच्यासोबत प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया यांच्या नावाचाही समावेश होता. तसेच, शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडमधील 'धिस मुवमेंट' आणि 'अॅज वी स्पिक' या अल्बमसाठी देखील झाकीर हुसैन आणि राकेश चौरासिया यांना गौरविण्यात आले.
 
 
तसेत, यापुर्वी म्हणजे २०२३ मध्ये बेंगळुरू-स्थित संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता. प्रसिद्ध संगीतकार रिकी केज यांनी २०१५ मध्ये त्यांच्या 'विंड्स ऑफ संसार' या अल्बमसाठी पहिल्यांदा तर २०२२ मध्ये 'डिव्हाईन टाइड्स' अल्बमसाठी 'बेस्ट न्यू एज अल्बम' श्रेणीत स्टीवर्ट कोपलँडसोबत दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.
 
तबल्याच्या तालावर लोकांना मंत्रमुग्ध करणारे पद्मविभूषण तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांना २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देत गौरवण्यात आले होते. झाकीर हुसैन तबला वादनाचे कौशल्य वडील प्रसिद्ध तबलावादक अल्ला रक्खा खान यांच्याकडून शिकले. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांकडून त्यांनी पखावज शिकण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. पद्मविभूषण झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार होते ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल-स्टार जागतिक मैफलीत भाग घेण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. यापुर्वी देखील १९९२ मध्ये 'द प्लॅनेट ड्रम' आणि २००९ मध्ये 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमुल्य योगदानासाठी पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0