कामगार कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्लू.सलग पाचव्यांदा विजयी

05 Feb 2024 21:35:04
Worker Kabaddi Competition

मुंबई :
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण जेएसडब्लू डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिला खुला विभागात बँक ऑफ बडोदा अजिंक्य ठरले आहेत. विजेत्या संघांना मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अशोक उर्फ भाई जगताप, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, न्युज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोरे, नवरोसजी वाडिया हॉस्पिटल सचिव दिलीप शहा, एच.आर.प्रमुख संतोष चव्हाण आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पुरुष ग्रामीण विभागात जे.एस.डब्लू विरुद्ध रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यात अंतिम लढत झाली. पहिल्या डावात १२-१२ असा अत्यंत अटीतटीचा सामना बघायला मिळाला. दुसऱ्या डावात जेएसडब्ल्यूने राज पाटील, जितेश पाटील यांच्या चढाई आणि सूचित पाटीलच्या उत्कृष्ट पकडीच्या जोरावर १९ – १० अशी ९ गुणांची आघाडी घेत विजयी चषकावर आपले नाव कोरले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून समाधान मोरे, प्रशांत जाधव, विराज राणे यांनी केलेले प्रयत्न तोकडे ठरले.

पुरुष शहरी विभागात अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदा विरुद्ध मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यातही कडवी झुंज बघायला मिळाली. पहिल्या डावात मुंबई पोर्ट ट्रस्टने सौरभ राऊत, ज्ञानेश्वर जाधव यांच्या उत्कृष्ट चढाई आणि कृष्णा पवार यांच्या उत्कृष्ट पकडीच्या जोरावर ११–२१ अशी १० गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बँक ऑफ बडोदाने कडवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबई पोर्ट ट्रस्टने आक्रमक खेळ करत त्यांना १० – १४ अशा ४ गुणांच्या फरकाने मागे टाकले. हा सामना मुंबई पोर्ट ट्रस्टने २१ – ३५ अशा १४ गुणांच्या फरकाने सहज जिंकला. बँक ऑफ बडोदाकडून गजानन, चिन्मय गुरव, संभाजी बाबरे यांनी चांगला खेळ केला.

महिला खुला विभागात अंतिम सामना आर.बी.स्पोर्ट्स विरुद्ध बँक ऑफ बडोदा यांच्यात झाला. या सामन्यात पहिल्या डावापासून बँक ऑफ बडोदाचे वर्चस्व दिसून आले. बँक ऑफ बडोदाच्या आक्रमक खेळामुळे प्रतिस्पर्धी संघ पहिल्या डावात १०–२६ अशा तब्बल १६ गुणांनी पिछाडीवर होता. दुसऱ्या डावातही बँक ऑफ बडोदाने ०६–२४ अशा तब्बल २० गुणांची आघाडी घेत आर.बी.स्पोर्ट्सला खेळ सावरण्याची संधी दिली नाही. बँक ऑफ बडोदाने पूजा यादव, शुभदा खोत यांच्या उत्कृष्ट चढाई आणि पौर्णिमा जेधे हिच्या उत्कृष्ट पकडीच्या जोरावर १६ – ५० अशा ३४ गुणांच्या फरकाने सहज विजय मिळवला. प्रतिस्पर्धी संघाकडून वैष्णवी चव्हाण, साक्षी भोईर यांनी केलेला प्रतिकार निरुपयोगी ठरला.

ग्रामीण पुरुष विभागाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जे.एस.डब्लू डोलवी विरुद्ध खुशबू आईस्क्रीम यांच्यात २६-२६ अशी कडवी झुंज बघालया मिळाली. पहिल्या डावात जे.एस.डब्लू डोलवीने १४ – १३ अशी एका गुणाची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात १२ – १३ गुणांसह खुशबू आईस्क्रीमने एका गुणाची आघाडी घेत सामना २६–२६ असा बरोबरीवर आणला. त्यानंतर प्रत्येक संघांना पाच डाव चढाईची संधी देण्यात आली. त्यात जे.एस.डबलु.डोलवीने ७-३ अशी ४ गुणांची आघाडी घेत संधीचे साने केले. जे.एस.डबलु.डोलवीकडून राज पाटील, जिनेश पाटील उत्कृष्ट चढाई, तर सूचित पाटील, सुशील पाटील यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. प्रतिस्पर्धी संघाकडून पार्थ ठाकूर, इरफान मरी, सौरभ वायकर, वैभव मोरे यांनी चांगला खेळ खेळला.

स्पर्धेत उपांत्य फेरीत ग्रामीण पुरुष विभाग रायगड मध्यवर्ती सहकारी बँक वि.वि. कूपर वॉरियर्स ३६-२७, शहरी पुरुष विभागात बँक ऑफ बडोदा वि.वि. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ५९–३९, मुंबई पोर्ट ट्रस्ट वि.वि.न्यू इंडिया इन्शुरन्स ३८-२७ यांच्यात लढत झाली. स्पर्धेत एकूण ११५ संघांनी सहभाग घेतला होता.

Powered By Sangraha 9.0