सार्वजनिक शौचालयांवर उभारणार सौर पॅनल

05 Feb 2024 21:53:56
Solar Panel on Public Toilets in Mumbai City
 
मुंबई :  मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मुंबई महापालिका विशेष प्रयत्नशील आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणात झोपडपट्टयांमुळे होणारी हानी लक्षात घेता मुंबई महापालिका झोपडीवासीयांसाठी १६ सुविधा शौचालये बांधणार असून या १६ ठिकाणी नाममात्र शुल्क आकारून कपडे धुण्याची स्वयंसेवा पध्दतीच्या यंत्रांची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. विशेष म्हणजे या सोयीवरील विद्युत खर्च कमी करण्याकरीता सौरउर्जा पॅनल्ससुध्दा बसविणाऱ असून त्यासाठी ५१ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या पाहता दक्षिण मुंबई तसेच मुलुंड, वांद्रे, शीव आदी जास्त वर्दळीच्या १८ सार्वजनिक ठिकाणी अत्याधुनिक सोयीयुक्त शौचालयांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ७८ कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे.

म्हाडा प्रसाधनगृहांची जबाबदारीही पालिकेकडे

पालिकेतील विविध विभागात म्हाडाने बांधलेल्या एकूण २,९८७ शौचालयांच्या दुरुस्ती/पुनर्बाधकामाचे कामही यंदा प्रथमच पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण ३१,४६४ इतकी आसने उपलब्ध होणार आहेत. यावेळी लॉट-१२ मध्ये विशेषतः झोपडपट्टयामधील नागरीक, चाळ तसेच वस्त्यांमधील नागरिकांच्या स्वच्छताविषयक गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यासाटी पालिका तिच्या २४ विभागात एकूण ५५९ शौचालये बांधणार असून त्यात १४,१६६ शौचालय आसनांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0