रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे दिल्लीत सुशासन महोत्सव

05 Feb 2024 18:38:45
Rambhau Mhalgi Prabodhini News
 
नवी दिल्ली: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे दिल्ली येथे ९ आणि १० फेब्रुवारी रोजी सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत दिली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महोत्सवास उपस्थित असतील.

सुशासन व जनकल्याण हा धागा पकडून विविध राज्यांमध्ये व केंद्रीय मंत्रालयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याकरिता अनेक अभिनव उपक्रम व योजना राबवल्या जात आहेत. या कल्याणकारी योजनांचे प्रदर्शन आणि विविध मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या सार्वजनिक मुलाखती असा भव्य कार्यक्रम अर्थात ‘सुशासन महोत्सव’ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे ९ व १० फेब्रुवारी रोजी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे.

कार्यक्रमात आसाम सरकार, गोवा सरकार, राजस्थान सरकार, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार सहित १५ संस्थांच्या योजनांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते होणार असून, महोत्सवात आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, तेजस्वी सूर्या या नेत्यांच्या मुलाखती होणार आहेत.



Powered By Sangraha 9.0