एनडीेए ४०० पार, तर भाजपला ३७० जागा मिळणार; पंतप्रधान मोदींना विश्वास

05 Feb 2024 20:00:50
PM Narendra Modi on NDA in Upcoming Election

नवी दिल्ली :
आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळास केवळ सव्वाशे दिवस उरले आहेत. आता तर देशातील जनतेसह मल्लिकार्जुन खर्गेही ‘अबकी बार ४०० पार’ असे म्हणत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीस (रालोआ) ४०० जागा तर भाजपला ३७० जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेस उत्तर दिले. भारताच्या महान परंपरांना पुढची हजारो वर्षे उर्जा देणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराची उभारणी नुकतीच झाली आहे. त्याचप्रमाणे आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळास प्रारंभ होण्यासही फार नव्हे तर अवघ्या शंभर ते सव्वाशे दिवसांचाच कालावधी उरला आहे. सध्या संपूर्ण देशाचा ‘मूड’ पाहता देशातील जनतेसह मल्लिकार्जुन खर्गेदेखील ‘अबकी बार ४०० पार’ असे म्हणत आहे. अर्थात, आपला असे आकडे सांगण्यावर विश्वास नाही. मात्र, देशातील वातावरण पाहता भाजपप्रणित रालोआस ४०० जागा आणि भाजपला ३७० जागा लोकसभा निवडणुकीत नक्कीच प्राप्त होतील; असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

घराणेशाहीमुळे काँग्रेससोबतच देशातील अन्य विरोधी पक्षांचेही नुकसान झाल्याचा टोला पंतप्रधानांनी लगाविला. ते पुढे म्हणाले, निवडणुक लढण्याचा आणि त्यामध्ये विजय मिळवण्याचा उत्साह संपुष्टात आला आहे. काँग्रेसचे काही नेते तर गतवेळप्रमाणेच यावेळीही लोकसभा मतदारसंघ बदलण्याचा तर काही नेते लोकसभेतून राज्यसभेत जाण्याचाही विचार करत असल्याचा टोला सोनिया व राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधानांनी लगावला. काँग्रेस पक्षाचे दुकान वारंवार एकच प्रॉडक्ट लाँच करून आता अखेरीस बंद होण्याच्या मार्गावर आले आहे. मात्र, तरीदेखील काँग्रेसला सुबूद्धी येत नाही. आपल्या पक्षातील एका नेत्याच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, यासाठी काँग्रेसने आपल्या आणि अन्य विरोधी पक्षातील तरूण नेत्यांनाही पुढे येऊ दिले नाही. परिणामीन काँग्रेस प्रमाणेच अन्य विरोधी पक्षदेखील प्रभावहीन झाले असून जनता त्यांना आता दीर्घकाळपर्यंत विरोधी बाकांवर बसवणार आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील प्रथम तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. रालोआ सरकारचा पहिला कार्यकाळ काँग्रेस काळातील खड्डे बुजवण्यात गेला, त्यानंतर दुसरा कार्यकाळ हा आश्वासनांच्या पूर्ततेचा होता आणि तिसरा कार्यकाळ हा विकसित भारताच्या निर्माणास गती देण्याचा असेल; असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

भारतीयांप्रती न्यूनगंड नेहरू काळापासूनच

भारतीयांच्या क्षमता आणि सामर्थ्यावर पं. नेहरूंच्या काळापासूनच काँग्रेसचा विश्वास नव्हता. नेहरूंनी आपल्या लाल किल्यावरील भाषणामध्ये म्हणाले होते की, “भारतीयांना मेहनत करण्याची सवय नाही. मात्र, अमेरिका, रशिया, जपान, चीन आदी देशातील लोक मेहनत करतात आणि त्यांना बुद्धीही आहे”. अशाप्रकारे भारतीयांचाच अपमान करण्याची काँग्रेसची प्रथा ही नेहरूंच्या काळापासून असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला.

Powered By Sangraha 9.0