महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भांडुप परिमंडळाची सरशी

05 Feb 2024 18:32:10
Mahavitaran Inter circle Sports Competition

मुंबई :  महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार दिवसीय क्रीडा स्पर्धेत भांडुप परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध खेळामध्ये यश मिळविले आहे.
 
महावितरण मधील कर्मचार्‍यांच्या क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी झाले. या चार दिवसीय स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅटमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, टेनीकॉइट, ब्रीज, कुस्ती, १००, २००, ४००, ८००, १५०० व ५,००० धावणे, ४*१०० मी रिले, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक आशा विविध खेळांचा समावेश होता.
 
यामध्ये भांडुप परिमंलातील साईनाथ मसणे यांनी १०० मीटर धावणे ( पुरुष) यामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच, प्रिया पाटील हिने १०० मीटर, २०० मीटर व ८०० मीटर धावणे (महिला) स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविला आहे. रिता तायडे यांनी ४०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. ४*१०० मी रिले मध्ये प्रिया पाटील, सारिका जाधव, प्रेरणा रहाटे, सोनाली मोरे यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय, टेबल टेनिस ओपन एकेरी स्पर्धेत मंगेश प्रजापती यांनी रौप्यपदक तर टेबल टेनिस टीम भुजंग खंदारे, मंगेश प्रजापती, राजेश पाटील, फ्रान्सिस रॉड्रिक्स,शुभम श्रीवास्तव यांच्या टीमने सुवर्णपदक पटकाविले आहे.

उंच उडी या खेळात सोनाली मोरे यांनी रौप्यपदक जिंकले आहे. तर, अनंत नागरगोजे यांनी कुस्ती वजनगट ७० किलो यामध्ये रौप्यपदक जिंकले आहे. मुख्य अभियंता भांडुप परिमंडल सुनील काकडे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, भांडुप परिमंडल महेंद्र बागुल यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

Powered By Sangraha 9.0