प्रत्येक महसुली विभागात 'नमो महारोजगार मेळावा' घेणार! मंत्रिमंडळाचा निर्णय

05 Feb 2024 18:44:24

Mangalprabhat Lodha


मुंबई :
राज्यातील प्रत्येक महसुली विभागात नमो महारोजगार मेळावा घेण्यास सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ही संकल्पना असून, या माध्यमातून राज्यात २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत.
 
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसूली विभागात एक या प्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
 
या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली असून, उद्योजकांसह विविध घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.



Powered By Sangraha 9.0