मुंबई महापालिकेच्या राखीव निधीतून ५३८८.१५ कोटी खर्च

05 Feb 2024 21:03:50
BMC Reserved Fund used for infrastructure

मुंबई :
बृहन्मुंबई महापालिकेकडे सद्यस्थितीत एकूण ८४ हजार ८२४ कोटी ७ लाख रुपयांचा राखीव निधी आहे. यापैकी ३९,०६४.८६ कोटी रुपयांचा निधी भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतननिधी, उपदान निधी, कंत्राटदार आणि इतर पक्षकारांची मुदत ठेवी इत्यादी बांधील दायित्वापोटी आहे. उरलेली ४५,७५९.२१ कोटी रुपयांची रक्कम या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात विविध पायाभूत प्रकल्पांसाठी संलग्नीत करण्यात आली आहे.
 
हा राखीव निधी मुंबई शहरातील नागरिकांना सुधारित पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चा करताच वापरण्यात येतो. गेल्या वर्षभरात ५,३८८.५७ कोटी रुपये इतकी रक्कम काढली गेल्याने ही रक्कम ४५,७५९.२१ कोटी शिल्लक राहिली आहे.
 
पायाभूत सेवासुविधा उभारण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतल्यास ते किमान १० टक्के व्याज द्यावे लागते. तर पालिकेच्या ठेवींवर पालिकेला राष्ट्रीयकृत बँकांकडून सहा ते सात टक्के व्याज मिळते. त्यामुळे कमी व्याजदरावर पालिकेच्या ठेवी बँकेत ठेऊन अधिक व्याजदराने कर्ज घेण्यापेक्षा विकासकामांसाठी हा निधी वापरणे अधिक संयुक्तिक आहे, असे पालिका प्रशासनाचे मत आहे.

याच तत्त्वावर वर्षभरात पालिकेने मालमत्ता पुनर्स्थापना निधी, मालमत्ता पुनर्स्थापना आणि पुनर्वसन निधी, भूमी संपादन आणि विकास निधी, प्राथमिक शालेय इमारत परिक्षण निधी आणि संचित निधी व घसारा निधी या राखीव निधीतून ५,३८८.१५ कोटीचा निधी काढला.
 
सन २०२४-२५ या वर्षात ही भांडवली खर्चासाठी या राखीव निधीतून ११,६२७.५४ कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे प्रस्तावित केले आहे. गत अर्थसंकल्पात ५,९७० कोटीची अनर्गत कर्ज घेण्याचे प्रस्ताविले होते. पण ते कर्ज काढण्याची आवश्यकता भासली नसल्याचे प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. याचा अर्थ गेल्यावर्षीच्या निधीतून गेल्यावर्षी ५,३८८.१५ कोटीचा निधी आकस्मिक निघालेल्या कामासाठी काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
Powered By Sangraha 9.0