काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच! अजितदादांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

05 Feb 2024 18:33:37

Ajit Pawar


मुंबई :
काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिले आहे. रविवारी बारामतीमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी शरद पवारांना उद्देशून केलेल्या एका वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
 
"ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुका येतील तेव्हा महायुतीचा उमेदवार कोण आहे हे जाहीर करेन. पण मी स्वत: उमेदवार आहे असं समजून तुम्ही मतदान करायला हवं, ही माझी विनंती आहे. कुणी भावनिक होतील. कुणी म्हणतील आमची ही शेवटची निवडणुक आहे. पण खरंच ती शेवटची कधी होणार हे मला माहिती नाही. परंतू, तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला कामाचं सातत्य टिकवायचं असेल तर माझ्या विनंतीला सहकार्य करा," असे अजित पवार बारामतीच्या सभेत म्हणाले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली.

 
यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0