विद्यापीठ परिसर जय श्रीराम घोषणांनी दणाणला, प्रशासनास विचारला जाब

04 Feb 2024 23:08:14
sppu

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केन्द्र गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभू रामचंद्र व सीता माता यांच्या विषयी अपशब्द काढले गेले व त्यांची विटंबना करण्यात आली, त्याविरोधात अभाविप पुणे महानगर व अन्य संघटनांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा ने आज विद्यापीठ परिसर दणाणला. जय श्रीराम च्या घोषणा परिसरात आणि मोर्चा निघालेल्या मार्गावर दिल्या जात होत्या.यावेळी हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
भारतीय संस्कृती भारतीय परंपरा व भारतीय देव- देवता यांच्यावर सतत होणाऱ्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायम उभी आहे, असे सहभागी विद्यार्थी नेत्यांनी सांगितले. काही डाव्या विचारांच्या संघटना ठरवून अशा हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्या,कमी लेखणाऱ्या गोष्टी करत असल्याचे चित्र सर्वांनाच दिसत आहे, विद्यापीठात अशा प्रवृत्तींना थारा देता कामा नये, हे विद्येचे मंदिर आहे, त्यामुळे घडलेल्या संतापजनक घटनेत जे कोणी विद्यापीठातील लोक सहभागी आहेत,त्यांच्यावर विद्यापीठाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा अभाविप आणखी आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
  
sppu
 
ललित कला केंद्रामध्ये घडलेल्या प्रकारातील दोषींवर पोलिस कारवाई करण्यात आली,मात्र अजून सुद्धा विद्यापीठाकडून कारवाई करण्यात आली नसल्यामुळे हा मोर्चा समस्त हिंदू बांधवांकडून काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले. या मोर्चात विश्व हिंदू परिषद, पतित पावन संघटना, भाजपा, बजरंग दल,राजे शिवराय प्रतिष्ठान,आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
 
देशविरोधी, समाजविघातक शक्तीचा उपद्रव अमान्य
सर्व देश विरोधी व समाजघातकी संघटनांच्या समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एका भिंती सारखी उभी आहे त्यांना कोणत्याही पद्धतीचा थारा दिला जाणार नाही, त्यांचा उपद्रव आम्ही भविष्यात देखील सहन करणार नाही असा इशारा देत यापुढे विद्यापीठांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अभाविप काम करणार असल्याचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी सांगितले.देशविरोधी, समाजविघातक शक्तीचा उपद्रव अमान्य असल्याचे ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0