राणीच्या बागेतील पुष्पोतस्वाला उत्तम प्रतिसाद

04 Feb 2024 20:23:17


flower festival mumbai zoo
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी): भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते रविवार दि. ४ फेब्रुवारी या दरम्यान पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. या पुष्पोत्सवामध्ये ऍनिमल किंगडम या थीमवर आधारित हत्ती, सिंह, वाघ, झेब्रा, जिराफ, अस्वल, हरणे अशा प्रकारच्या प्राण्यांच्या प्रतिकृती तयार करत त्यांना फुलांनी आच्छादण्यात आले होते. विविध औषधी वनस्पती, बोन्साय झाडे, फुलझाडे यांचाही प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. लहान मुलांबरोबर मुंबईकरांचा या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान यांच्या सहयोगातून साकारण्यात आलेल्या या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद देत तब्बल एक लाखाहून अधिक मुंबईकरांनी या महोत्सवाला भेट दिली. या प्रदर्शनामध्ये दहा हजार कुंड्या मांडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विविध फळझाडे, फुलझाडे, भाजीपाल्याच्या कुंड्या यांचा समावेश करण्यात आला होता.


“गेली २७ वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो. साधारणपणे, ९० दिवस आधी या प्रदर्शनात मांडाव्या लागणाऱ्या रोपांची लागवड करण्यात येते. दरवरर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला याचाच आनंद आहे.”

- जितेंद्र परदेशी
उद्यान अधिक्षक,
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय 




Powered By Sangraha 9.0