‘चेकमेट’, ’फास्टर फेणे’, ’आम्ही असू लाडके’, ’बांगरवाडी’, ’निलांबरी’ असे मराठी चित्रपट, ‘मुरांबा’ चित्रपटासाठी ’फिल्मफेअर पुरस्कार’, ’मलाल’ हा हिंदी चित्रपट आणि २५च्यावर मालिकांमध्ये काम करून, संवेदनशील अभिनयाचा ठसा उमटवणारी आणि सामाजिक भान जपून, एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून वेगळी ओळख निर्माण करणारी समर्थ अभिनेत्री म्हणजे चिन्मयी सुमीत. एका समारंभानिमित्त त्या नुकत्याच पुण्यात आल्या असताना, त्यांनी दै. ’मुंबई तरूण भारत’शी मनमोकळा संवाद साधला...
पुण्याशी तुमचं एक छान नातं आहे, असं कळलं. काय आहे हे नातं नेमकं?
हो, अगदी खरंय! मी एका अर्थाने पुणेकरच आहे. मूळचे आम्ही मराठवाड्यातले. पण, आमचं कुटुंब पुण्यात राहत होतं. कारण, माझे वडील रवींद्र सुर्वे आयएएस ऑफिसर होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे मुलांचं शिक्षण एकाच जागी सुसूत्रपणे व्हावं, असं आई-वडिलांनी ठरवलं. म्हणून आम्ही पुण्यात स्थिरावलो. माझं पदवी शिक्षण एस. पी. कॉलेजला झालं. विशेष म्हणजे, माझे वडीलही एस. पी. कॉलेजचेच विद्यार्थी. अत्यंत हुशार, साहित्याची जाण असलेले व्यासंगी असा त्यांचा नावलौकिक होता. त्यांची मुलगी म्हणून ती पुण्याई माझ्या वाट्याला आली. मी कला शाखेत हिंदी विषयात पदवी घेताना, कॉलेजच्या साहित्यिक- सांस्कृतिक उपक्रमांशी छान जोडली गेले, तर असं माझं पुण्याशी खूप सुंदर नातं आहे.
आज एक समर्थ, दमदार आणि बुद्धिमान अभिनेत्री म्हणून तुमचा एक खास ठसा आहे. पण, अभिनयाचा हा प्रवास नेमका कधी सुरू झाला, हे ऐकण्याची उत्सुकता आहे. पहिलं नाटक कोणतं होतं?
सांगायला आनंद वाटतो की, माझा अभिनय प्रवास पुण्याच्या एस. पी. कॉलेजमधून आणि तोही लोकप्रिय ’पुरुषोत्तम करंडक’मधूनच सुरू झाला. नंतर मला चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या ’ज्वालामुखी’ या नाटकासाठी विचारलं. ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक. तेव्हापासून चित्रपट, नाटक, मालिका असा अभिनय प्रवास घडत गेला. तुम्ही म्हणताय तसा शैलीदार अभिनय किंवा बुद्धिमान व्यक्तिमत्त्वं असं वाटत असेल तर त्याचं सगळं श्रेय माझ्या आई-वडिलांचं. वडील खूप विद्वान, शंकरशेट स्कॉरशिप प्राप्त, आयएएस ऑफिसर, तर आई मानसशास्त्राची प्राध्यापिका. घरात वातावरण अभ्यासू. त्या काळी वाचनाला टीव्ही, मोबाईल असा काही पर्यायच नव्हता. आकाशवाणी आणि वाचन ही तेव्हाची जीवनशैली होती. वाचनाने शब्दसंपत्ती वाढते. नीट विचार करून वागणे, आपले विचार आणि भावभावना ठामपणे व्यक्त करणे, असं व्यक्तिमत्त्वं घडत गेलं. तेच अभिनयात उतरत असावं!
पुस्तकप्रेमी, मनस्वी आणि विवेकी असं एकूणच तुमचं व्यक्तिमत्त्व. त्यातून तुम्ही जगण्याकडे गांभीर्याने पाहता, असं वाटतं. या पार्श्वभूमीवर तुमचं स्वतःचं असं काही विशिष्ट जीवन तत्त्वज्ञान आहे का?
प्रत्येक क्षण समरसून जगणं, हेच माझं तत्त्वं. घडून गेलेल्या गोष्टींचं ओझं बाळगणं मला आवडत नाही. ज्या क्षणी आपण जे करीत असतो, तो ’वर्तमान क्षण’ जगणं महत्त्वाचं! अगदी दुःखंही मी मनःपूत अनुभवते. रूप-रंग-गंध या गोष्टींचा त्या-त्या वेळी आनंद घ्यायला मला आवडतो. सतत प्रवाही राहणं, रिजीड न होणं आणि आयुष्य भरभरून जगणं, माणसाला जमायला हवं. मी तेच करते. विवेकी म्हणाल, तर कोणत्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात, कोणत्या गोष्टी सहजतेने स्वीकाराव्यात, याबद्दल आपल्याला योग्य तो निर्णय करता यावा. कधी-कधी अभावात्मकताच सुखाचे नवे मार्ग शोधायला भाग पाडते. काही गोष्टी अनुभवातून शिकता येतात. यातून विवेक जागा होत जातो. तोच आपल्या वर्तनात उतरतो.
’मुरांबा’ सारखा वेगळा चित्रपट, ’लेकुरे उदंड झाली’ सारखं लोकप्रिय नाटक, टीव्ही मालिका यात तुमची व्यक्तिरेखा प्रत्येकवेळी वेगळी वाटते. हे वेगळेपण कसं जपता, कुठली अभिनय परंपरा तुम्हाला जवळची वाटते?
मी उत्स्फूर्तपणे काम करते. सहजतेने अभिनय करणं, हेच मला जमतं. कारण, मी प्रशिक्षित अभिनेत्री नाही. अर्थात, अभिनय प्रशिक्षण घेणार्यांचा मला प्रचंड आदर आहे. संधी मिळाली असती, तर मीही प्रशिक्षण घेतलं असतं. माझ्या भोवतीचे प्रशिक्षित नट किती उच्च प्रतीचा अभिनय करतात, ते मी बघते. वंदना गुप्ते यांच्याकडून मी नाटकासाठी दोन मिनिटांत साडी कशी बदलावी, हे शिकले. भारती आचरेकर, नीना कुलकर्णी, स्वाती चिटणीस अशा दिग्गजांकडून मिळालेलं संचित हीच अभिनय परंपरा घेऊन माझं काम सुरू आहे.
अभिनयापलीकडे एक सामाजिक भान जपणारी व्यक्ती म्हणूनही तुमची वेगळी ओळख आहे. शिक्षणाचं माध्यम मराठी असावं, या विषयावर तुम्ही बरंच काम करता, विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवादही साधता. तेव्हा, हे वेगळं वळण कधी सुरू झालं?
सामाजिक जाणिवेचं हे वळण माझ्यासाठी नवीन नाही. माझी आई मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होती. घरात आपल्या भोवती जे घडतं, ते संपृक्त होऊन आपल्यात आपोआप उतरतं. शिक्षण हा आमच्या घरात खूप जिव्हाळ्याचा विषय. त्यातही मराठी माध्यमाचं महत्त्वं मनावर बिंबलेलं. माझं शिक्षण मराठीतून झालं. माझी मुलंही मराठी माध्यमात शिकतात. मातृभाषेतून शिक्षणाचा पाया भक्कम होतो, म्हणून मी हे काम जबाबदारीच्या जाणिवेने करते आहे. या कामाची सुरुवात मात्र अचानक झाली. एकदा मुलांच्या शाळेत पालकसभेत या विषयावर मला विचार मांडायला सांगितले. ते भाषण ऐकून शाळेने मला थेट ‘शिक्षण सदिच्छादूत’ ही जबाबदारीच दिली. त्या अंतर्गत मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी मी काही करू शकते, याचे खूप समाधान आहे. कारण, मुलांची गुणवत्ता सुधारणे, हे फार मोठे आव्हान सध्या आपल्यापुढे आहे.
सध्या ओटीटीसारख्या माध्यमात ’बोल्ड’ या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतोय, याबद्दल जाणकार चिंता व्यक्त करतात, यावर तुमचं मत काय?
जाणकारांनी चिंता करू नये. कारण, प्रत्येक नवी पिढी आपली अभिव्यक्ती मांडते, तेव्हा आधीच्यांना ती ‘बोल्ड’ वाटते. पण, खरं तर काळाबरोबर काही गोष्टी सहज बदलत जातात. ही माध्यमं सेन्सॉर मुक्त असल्याने, या मंडळींना जास्तच मोकळेपण मिळाल्याने, स्वातंत्र्याचा उद्रेक दिसतो; पण लवकरच याचा निचरा होईल. आपल्या संस्कृतीशी फटकून असलेली गोष्ट आपण चटकन स्वीकारू शकत नाही. पण, थोड्याच काळात इथेही चांगलं काही घडताना दिसेल. चांगल्या वेबसीरिजमध्ये भूमिका करायला मलाही आवडेल.
प्रसिद्ध कलावंताचं यशस्वी जीवन बघताना, लोकांना नेहमी या वलयाचं आकर्षण वाटतं. पण, यामागे खूप कष्ट, संघर्ष असतो. तुम्ही या वलयामागची कोणती गोष्ट सांगाल?
खूप गोष्टी आहेत. शूटिंग किंवा प्रयोग यासाठी तारखा दिलेल्या असतात. ती कमिटमेंट पाळावी लागते. सततचे दौरे, प्रवास याचा ताण असतो. जेवणाच्या अनियमित वेळा, जागरणं, व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे शारीरिक त्रास उद्वतात. कित्येकदा तब्येत ठीक नसूनही, दिलेला शब्द पाळण्यासाठी काम करावंच लागतं! वैयक्तिक गोष्टींचा प्रसंगी त्याग करावा लागतो. कित्येकदा भूमिकेची तयारी करण्यासाठी, मोठी मेहनत घ्यावी लागते. त्याचा भावनिक-वैचारिक ताणही काही जणांना जड जातो, तरीही हे सगळं झेलून कामाचा जो आनंद मिळतो, तोच कलाकाराचा जीव की प्राण असतो.
सुमित राघवन आणि तुम्ही मराठी रसिकांची आवडती जोडी. पण, तुम्हाला प्रभावित करणारी अशी कोणती जोडी आहे का?
मला सर्वात आवडणारी जोडी म्हणजे सुप्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट व अनिता अवचट. एकमेकांच्या कामाबद्दल आदर करणारं, एक सुंदर सहजीवन कसं असावं, याचं मला ते आदर्श उदाहरण वाटतात. त्यानंतर माझे आई-बाबा ही माझी सर्वात आवडती जोडी. त्यांनी एकमेकांच्या गुणांचा आदर करून, सुरेख संसार उभारला. लग्नानंतर राघवन कुटुंबात अतिशय आदरणीय वाटलेली जोडी म्हणजे माझे सासू-सासरे, त्यांच्याकडून मी जोडीदाराशी कसं वागावं, याबद्दल खूप गोष्टी शिकले.
आगामी कोणत्या कलाकृतीत आम्ही तुम्हाला बघणार आहोत? हिंदी चित्रपट, हिंदी मालिका यात काम करण्याबद्दल काही नवी योजना आहे का?
नव्या योजना एक कलाकार म्हणून आम्हाला तरी काही करता येत नाहीत. समोरून विचारणा होईल, ती भूमिका स्वीकारणे किंवा नाकारणे एवढेच आमच्या हातात असतं. सध्या तरी मी मालिकांमध्ये काम थांबवले आहे. एका नाटकाच्या प्रयोगांत मी रमलेय. ‘अस्तित्वं’ हे नवं नाटक घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. ही भूमिका माझ्या ‘कंफर्ट झोन’ बाहेरची आहे. मी कधी चाळ संस्कृती अनुभवली नाही. चाळीतल्या सफाई कामगाराची पत्नी, अशी माझी ही व्यक्तिरेखा आव्हानात्मक आहे. तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती की, जरूर रसिकांनी हे नाटक बघावे.
नक्कीच! पण, आजपर्यंत तुम्ही वाचलेल्या साहित्यातली कोणती नायिका मनाला भुरळ पाडून गेली की, ती भूमिका तुम्हाला स्वतःला साकारावी वाटते?
मला फार मनापासून साकार करायची होती, ’सखाराम बाईंडर’ मधली चंपा. सुदैवाने मला ती करायला मिळाली. त्यानंतर दुसरी नायिका म्हणजे ’बाया कर्वे.’ महर्षी कर्वेंच्या हिमालयाएवढ्या कर्तृत्वाला भक्कम साथ देणारी आणि तरीही स्वतःचं व्यक्तिमत्त्वं स्वतंत्रपणे फुलवणारी बाया कर्वे यांची भूमिका साकारण्याची भुरळ मला आहे.
वा! अशा तुमच्या मनासारख्या भूमिका तुम्हाला मिळोत, अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि भेटीचा समारोप करताना, या मनमोकळ्या संवादासाठी तुम्ही वेळ दिलात, याबद्दल दै. ’मुंबई तरूण भारत’च्यावतीने तुमचे मनःपूर्वक आभार मानते.
धन्यवाद.
अमृता खाकुर्डीकर