दशरथनंदन ‘राम’ ते परब्रह्म ‘श्रीराम’

03 Feb 2024 20:59:14
DashrathNandan shri ram

वाल्मिकी ऋषींनी रघुकुलदीपक, दशरथनंदन रामास, आपल्या रामायणात मनुष्य म्हणून चित्रित केलेले आहे; पण पुढे काही शतकांनी या रामाची परब्रह्म, विष्णूंचा अवतार म्हणून पूजा, भक्ती, आराधना सुरू झाली. पुराणांमध्ये ‘अध्यात्म रामायण’, ‘आनंद रामायण’, ‘परमेश्वर संहिता’ या ग्रंथांतून रामाचा ‘परब्रह्म’ म्हणून गुणगौरव केला आणि पुढे भारतवर्षातील सकल संतांनी रामाला ‘अवतारीपुरूष’ म्हणून आराध्य मानून, भक्तिभावाने त्याचे शब्दपूजन सुरू केले. रामोपासनेचा पुरस्कार करणारी दोन उपनिषदेही लिहिली गेली आणि रामोपासनेला देशभर नवे धुमारे फुटले.

श्री परशुराम, दशरथनंदन श्रीराम आणि श्रीकृष्णांचे बंधू बलराम असे तीन रामावतार असले, तरी ‘राम’ म्हणताच, सकल भारतवासीय जनताजनार्दनाच्या डोळ्यापुढे येतो, तो दशरथनंदन, रघुकुलदीपक अयोध्यापती राजा राम सीताराम. या रघुनंदाची प्रतापगाथा म्हणजेच ‘रामायण!’ महाकवी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले हे ‘रामायण’ भारतीय साहित्य विश्वातील ‘आदि महाकाव्य’ म्हणून गौरविले जाते. आपणास भारताच्या विविध प्रांतातील विविध भाषांमध्ये जी रामायणे आढळतात, ती सारी रामायणे, वाल्मिकी रामायणाचीच स्थल, काल, भाषा सापेक्ष अक्षर भावरूपे आहेत. नव्या कथा-उपकथा, चमत्कार यांनी परिवर्धित शब्दाविष्कार आहेत.

वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात वर्णिलेला राम हा ‘मर्यादा पुरुषोत्तम’ मनुष्य आहे, देव नाही. त्याकाळी रामाविषयी सर्वत्र अयोध्यावासी लोकांमध्ये परम आदराची भावना होती; पण ती रामाच्या ठायीची गुणसंपदा, लाघव या गुणांमुळे आणि रघुकुलाविषयी असलेल्या श्रद्धेपोटी होती. ‘मी देव नाही, दशरथपुत्र राम, मनुष्य आहे,’ असे उद्गारही वाल्मिकींनी रामायणात रामाच्या तोंडी घातलेले आहेत. पण, त्यानंतर अनेक शतकांनी, रामाला विष्णूंचा अवतार, देव असे लोकमानसात स्थान प्राप्त झाले आणि त्याची पूजा, आराधना, उपासना सुरू झाली. एवढेच नव्हे तर रामाला ‘अवतारी पुरुष - देवाधिदेव’, ‘परब्रह्म’ कल्पून अनेक अतर्क्य लीला, कथा, प्रसंगांनी, श्रद्धाभावाने नटलेली, ’अध्यात्म रामायण’, ‘आनंद रामायण’, ‘अद्भुत रामायण’ अशी अनेक रामायणेसुद्धा लिहिली गेली. वाल्मिकी रामायण सोडून ही जी अनेक रामायणे लिहिली गेली, ती रामायणे म्हणजे ‘भाव तैसा देव’ अशी कवी-लेखकांच्या भावविश्वातील ‘राम कथा’ आहे.

वाल्मिकी रामायणात दोन कांडांची भर

वेदांमध्येही एका रामाचा उल्लेख आहे; पण त्याचा दशरथनंदन रामाशी काहीही संबंध नाही. तसेच गृह्यसूत्रांमध्ये एक सीताही आढळते; पण तिचा संबंध जनककन्या, अयोध्यापती रामाच्या सीतेशी नाही. ती सीता इंद्रपत्नी मानली जाते. काही पाश्चात्य विद्वानांनी राम व रामायणाचा संशोधनाच्या अंगाने विशेष अभ्यास केला आहे. ते रघुनंदन रामाला वैदिक देवता इंद्राचेच एक रूप मानतात. इंद्राचे गुण त्यांना रामात दिसतात.

महाभारताच्या नारायणीय उपाख्यानात नारायण म्हणजे विष्णूच्या अवतारांच्या ज्या वेगवेगळ्या नामावळी दिलेल्या आहेत, त्या दोन नामावळीत ‘दशरथनंदन’ रामाचे नाव विष्णू अवतार म्हणून समाविष्ट केलेले दिसते. त्यावरून संशोधक असा तर्क करतात की, रामायण-महाभारतावर वैष्णव मताचा प्रभाव पडल्यावर, वाल्मिकींच्या मूळ मानव रामाला हे विष्णू अवताराचे स्वरूप प्राप्त झाले असावे. एवढेच नव्हे तर एकदा रामाची अवतार-देव म्हणून लोकमानस मंदिरात प्रतिस्थापना होताच, पुढे कोणातरी रामभक्ताभिमान्या विद्वानांनी-कवींनी ‘वाल्मिकी रामायणा’ला ‘बालकांड’ व ‘उत्तरकांड’ अशी दोन कांडे जोडून मूळचे पाच कांडी वाल्मिकी रामायण सात कांडी केले. त्यामुळे या दोन नव्याने भर घातलेल्या कांडात राम ‘परब्रह्मरूप’, ‘अवतारी पुरूष’ असे वर्णन आढळते. काही विद्वान संशोधकांच्या मते, ‘अवतार’ ही संकल्पनाच कृष्ण अवतारापासून जन्माला आली आहे. याच काळात दशरथनंदन रामाचे अवतारपण रूढ झाले असावे. थोर विद्वान परशुराम चतुर्वेदी यांच्या मते, इसवी सनाच्या पहिल्याच शतकामध्येच राम हा देव अवतार म्हणून सर्वत्र पूजनीय, वंदनीय आहे असे आढळते. पुढे गुप्त सम्राटांच्या काळात पुराण वाङ्मयाची वृद्धी होऊन, पुराण ग्रंथांनी रामाला उपासना देवता म्हणून अधिक व्यापकपणे स्थापित व प्रचारीत केले असावे.

दक्षिणेतील आळवार संतांची रामभक्ती

दक्षिण भारतातील ‘आळवार’ वैष्णव भक्त भाविकांमध्ये विष्णूंचा अवतार म्हणून रामभक्ती प्रचलित होती असे दिसते. या आळवार भक्त कवींचा काळ इ. स. तिसरे ते चौथे शतक असा असून, त्यापूर्वी रामभक्ती रूढ असावी, असा अनुमान काढता येतो. त्यामुळे श्री परशुराम चतुर्वेदीच्या म्हणण्यानुसार रामभक्तीचा प्रारंभ हा इसवी सनाचे पहिले शतक असावा, याला दुजोरा मिळतो. आळवारांच्या भक्ती वाङ्मयात ‘राम’ हाच विष्णूंचा मुख्य अवतार मानला गेला आहे. बाकी अवतार हे गौण अवतार मानतात. आळवार कुलशेखर हा राजा होता. त्याची रामावर विशेष भक्ती होती. त्याने जी अनेक भक्ती काव्य लिहिली, त्याचा मुख्य विषय प्रभू रामचंद्र हाच आहे. रामचरित्रातील अनेक प्रसंग आपणास कुलशेखर आळवारच्या काव्यात आढळतात.

रामभक्ती पंथांचा उदय

सम्राट गुप्त काळात वैष्णव संप्रदायांना खूपच प्रोत्साहन व बळ प्राप्त झाले होते. त्यामुळे याच काळात वैष्णवभक्ती संप्रदायामध्ये रामभक्ती पंथाची स्वतंत्र शाखा विकसित होऊन, अनेक उपपंथांनी प्रभावीपणे प्रवाहित झाली. भगवान ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्यापेक्षाही रामभक्तीला लोकमानसात अधिक स्थान प्राप्त झाले. आश्चर्य म्हणजे, भगवान विष्णूंपेक्षा विष्णूंचा हा सातवा अवतार ‘राम’ भाविकभक्तांच्या गाभार्‍यात सर्वाधिक प्रिय देवता म्हणून विराजमान झाला. आळवार भक्तांनी रामभक्तीने दक्षिण भारत दुमदुमून टाकला.
 
इसवी सनाच्या ११व्या शतकात रामभक्तीने कळस गाठला. ‘परमेश्वर संहिता’ नावाचा, राममहती, रामभक्ती, रामआराधना करणारा ग्रंथ या शतकात प्रसिद्ध झाला. एवढेच नव्हे तर या शतकात रामोपासनेचा पुरस्कार करणारी दोन उपनिषदे (१) राम पूर्वतापनीय आणि (२) राम उत्तरतापनीय प्रसिद्ध झाली. रामभक्तीला नवे नवे धुमारे फुटले. या उपनिषदांनी श्रीरामाला ‘परब्रह्म’ स्वरुपात प्रस्थापित केले आणि पुढे धर्मपरायण भाविक समाजाने अयोध्येच्या ‘राजा रामा’पेक्षाही अधिक या ‘परब्रह्म राम’ स्वरुपाला शिरोधार्य व पूजनीय म्हणून स्वीकारले.
 
 
विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
(पुढील रविवारी ः देवर्षी नारद ः रामकथेचा आद्य उद्गाता)
Powered By Sangraha 9.0