अवघा रंग एक झाला...

03 Feb 2024 20:41:31
Avagha rang ek jhala Kavita sangrah

न्या. समरेंद्र निंबाळकर यांचा ’अवघा रंग एक झाला’ हा काव्यसंग्रह म्हणजे संवेदनशीलतेची अत्युच्च पातळी गाठत, मानवी मूल्यांचा शोध घेणारा काव्यसंग्रह. दोन आवृत्त्या निघालेल्या, हा काव्यसंग्रह काव्यरसिकांच्या पसंतीला उतरला. भोळ्याभाबड्या समाजाचे जीवन आणि आधुनिकतेने आयुष्याचे बदलेले परिमाण, या सगळ्यांचा वेध कवीने या काव्यसंग्रहात अत्यंत संवेदनशीलतेने, समर्थपणे घेतला आहे. या काव्यसंग्रहातले भावलेले काही इथे मांडले आहे.

कोणतेही नवे पुस्तक मग ते कथा, कादंबरी किंवा काव्यसंग्रह वाचले की, मनात लगेच संबंधित लेखक कवीची वर्गवारी येते. ‘अभिजात’, ‘विद्रोही’, ‘परंपरावादी’, ‘विज्ञानवादी’, ‘स्त्रीवादी’ वगैरे वगैरेचे ‘लेबल’ त्या लेखक किंवा कवीला लागते. कारण, त्यांच्या लिखाणातून तो एक प्रवाह सातत्याने प्रवाहित होत असतो. मात्र, कवी न्या. समरेंद्र निंबाळकर यांचा ’अवघा रंग एक झाला’ हा काव्यसंग्रह वाचून वाटले की, कविता ही सर्वार्थाने सर्वच सिद्धांतांच्या पुढे गेलेली आंतरिक भावना आहे. जी आंतरिक भावना स्व-संवेदनांसोबतच भवतालच्या जगाचे नाद लागलेली असते. तसेही समरेंद्र यांनी काव्यसंग्रहाच्या सुरुवातीलाच त्यांच्या कवितांबद्दल स्पष्ट लिहिले आहे. ते म्हणतात की, ”माझ्या कवितेवर अभिजात, विद्रोही, राजकीय, आत्मनिष्ठ, समकालीन आणि अमक्या ढमक्या सर्व प्रवाहांचे संस्कार झाले आहेत, हे मी मान्य करतो. माझी कविता स्वयंभू आणि अभिजात अस्सल वगैरे आहे, असा माझा अजिबात दावा नाही. जे-जे उत्तम, उदात्त, सुंदर आणि महनमुधर ते-ते मला प्रभावित करते.” मानवी मन काय, जीवन काय? विविध जाणिवांच्या संवेदना घेऊन, प्रत्येक माणसाचे जगणे सुरू असते. त्यातल्या संवेदना, जाणिवा, नेणिवा आणि भाव अनेकानेक असतात. त्या सगळ्या बर्‍या-वाईटाचे उमलणे, तर कधी ओरखडणे संवेदनशील कवीच्या मनावर उमटत असतात. त्या विविध रंगातून संमिश्रित झालेले इंद्रधनुषी भाव ही एकाच पोताची, एकाच रंगाची असूच शकत नाही. नेमका हाच ’अवघा रंग एक झाला’ या काव्यसंग्रहाचा सारार्थ आहे. त्यामुळेच १०० कविता असलेला हा काव्यसंग्रह अनेक भावतरंगांच्या पातळ्यांवर आपल्याला बांधून ठेवतो.

या १०० कवितांची कवी समरेंद्र यांनी सात भागांत वर्गवारी केली आहे. १) ऐलतीर पैलतीर २) कालाय तस्मै नमः ३) तूच तर होतीस ४) लग्न झालेल्या मजनूची गोष्ट ५) बालपणीच्या गारा ६) तुमच्या मागून चालताना ७) पल्याड आहे काही काव्यसंग्रहाच्या या सातही भागांमध्ये प्रत्येक स्तरावर कवीने अनुभवलेले वास्तव अत्यंत प्रखर तितकेच समर्पकपणे व्यक्त केले आहे. प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात कर्तव्याची पराकाष्ठा करून, अस्तित्व घडवू शकतो, हे सांगताना कवी ’कॅक्टस’ कवितेत लिहितात की,

फुलणे म्हणजे नसते नेहमी
फुलासारखे नाजूक उमलणे
फुलणे म्हणजे काट्यात सभोवतीआतील हिरवे रंग उधळणे
ज्या खडकातून रूजून आलो
त्या संदर्भाला सुरेख करणे
खरेच आहे, जिथे जन्मलो तिथे अनुकूलता नसेल, तरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचे अस्तित्व घडवणे, हे श्रेयस्कर. या काव्यसंग्रहाचे वैभव किंवा वेगळेपण काय तर, या काव्यसंग्रहामध्ये जवळजवळ सर्वच महापुरुषांच्या जीवनकार्यावर कविता आहेत. त्याचबरोबर कवीच्या अवतीभवतीच्या लोकांचे भावविश्व उलगडणार्‍याही कविता आहेत. त्यातली ’पवारमामी’ कविता तर शब्दातीत. मुलगा शहरात अर्थार्जनाला गेलाय. त्याची वृद्ध आई मरणाला लागली. मरतानाही ती मुलाचे नाव घेते; मात्र मुलगा शहरात रमलेला. मरतानाची तिची मुलाच्या भेटीसाठीची घालमेल सरमरेंद्र व्यक्त करतात की,

जीवच जात नव्हता दोन दिवस
घर घर लागली होती शेवटची
विलास विलास अस्पष्ट आवाज
मुंबईला तीन तारा करून झाल्या!
विलास आला तुम्ही गेल्यावर
पवारमामीची मरणव्यथा जितक्या ताकदीने समरेंद्र मांडतात, तितकेच समर्थपणे ते घरगुती हिंसेचा बळी ठरलेल्या वर्षावहिनीच्या मृत्यूची दाहकताही मांडतात. सूनबाई वर्षाला कुणी जाळले की, तिने जाळून घेतले? ती जळता-जळता गल्लीत सैरावैरा पळताना, समरेंद्र यांनी पाहिली होती. मृत्यूला इतक्या भयाण रितीने कवटाळणार्‍या वर्षावहिनींचे जीवन कसे असेल? हा प्रश्न कवी कवितेतून विचारत नाही. पण, कविता वाचून हा प्रश्न मनात आपसूकच वादळ निर्माण करतो. ‘पप्पा’, ’सलिम’, ’महंमद बिजी’ आणि ’रविवारची पुरवणी’ या ’कवितेतली आई’ या सगळ्या कविता कवीच्या वैयक्तिक भावसंदर्भातल्या न राहता, आपल्या मनाशी तादात्म्य पावतात. वाटत राहते, अरे हे सगळे आपल्याभोवती आहेत किंवा होतेच की...

या काव्यसंग्रहामध्ये प्रत्येक कविता मानवी मूल्यांचा जयघोष करते. त्याचवेळी मानवी मूल्ये आणि भौतिकता यांचा अमर वादही चित्रित करते. त्यामुळेच पूर्वीच्या राणी महाराणी काय किंवा आजही चार भिंतीतच राहायचा नाईलाज असणार्‍या काही स्त्रिया आहेत, त्यांचे जीवन काय? त्यांचे आत्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतलेले असते. त्या बंदिवान स्त्री जीवनाबद्दल कवी म्हणतात की,

झरोके ठेवायचे खिडक्यांना
पूर्वी राण्यांना बाहेरचे जग दिसावे म्हणून
केवढे औदार्य
खिडकी बंद झाली की
ताटातूट झाली तिची
बाहेरच्या हवेशीही आणि उरत असे
फक्त आत गुदमरलेली हवा
तिच्या मूक आक्रोशासारखी
आतल्या आत कोंडलेली
स्त्रियांच्या मानवी जीवनाबद्दल आक्रोश व्यक्त करणारे, कवी समरेंद्र पुरूषमनाच्या वेदनाही टिपतात. प्रेमात आकंठ बुडालेला प्रियकर जेव्हा प्रियतमेचा पती होतो, तेव्हा ज्या जबाबदार्‍या येतात, त्या जबाबदार्‍यांबद्दल कवी अंतरंगातले दबलेले दुःख ’पप्पूची चड्डी’, ‘सन्मुख’ तसेच ’लग्न झालेल्या मजनूची गोष्ट’ या कवितेतून मांडतो. ‘लग्न झालेल्या मजनूची गोष्ट’ कवितेत कवी लिहितो की,

करशील का लग्न पुन्हा
आपल्या आतून पुसतो कोण
संसाराचे दळतो दळण
झालो पीठ आपलीच गिरण
कवी मजनूच्या मजनूगिरी आठवत म्हणतो
लैला लैला करीत मजनू
बरं झालास तू मेलास रे
मजनूस तुझ्यातील एकटा गाठून
लग्नाने फुकटात
खाल्ला असता रे
मजनूने जर लैलासोबत लग्न केले असते, तर विवाह -पती-पत्नी या सगळ्यांमुळे त्याच्यातला प्रेमी म्हणजे मजनू मेला असता, असे कवीचे म्हणणे. अर्थात, हे काही सर्वार्थाने खोटे नाहीच म्हणा. तसेच आजच्या भौतिक जगात समोरच्या माणसाला माणूस म्हणून आपण पाहतो का? हे विदारक सत्य कवी आपल्या ’कितने हुए भैया’ कवितेत मांडतात. ते म्हणतात की,
 
कितने हुए भैया
या पलीकडे त्याच्याशी काही
सवांद करत नाही कोणी
पानवाला, सलुनवाला
पेपर टाकणारा किंवा दूधवाला
यांच्याशी तुम्ही म्हणाल
आणखी काय बोलायचं असतं?
कितने हुए भैयाच्या पल्याड
उभा असतो एक अख्खा माणूस
आपल्या बेफिकीरीच्या पल्याड
त्याला आपण लावलेल्या
लेबलच्या पल्याड
माणसातले माणूसपण जागवताना कवी जराही मागे हटत नाही. ते माणूसपण जपताना कवी दिव्यत्वाच्या तेजाचाही परामर्श घेतो. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी गाताना कवी समरेंद्र म्हणतात की,

चारशे वर्षार्ंपूर्वी जन्माला आलो असतो
तर महाराजांचा मावळा झाला असतो
हे जाती-पातीपलीकडचे मावळेपण जपताना, कवीला आधुनिक विषमतेचे पेचही दिसतात. महामानव केवळ विशिष्ट जातीपातीचे असे काही महाभागांनी ठरवलेले असते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, पुण्यश्लोक अहिल्याबाईंबद्दल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही विशिष्ट समाजानेच बोलावे-लिहावे, असे काहीसे घृणास्पद विचार काही लोकांचे आहेत. त्या चौकटीबाहेरच्या अर्थात जातीबाहेरच्या लोकांनी या विभूतींबबद्दल लिहिले की, काही विद्वेषी लोकांना आवडत नाही. याबद्दल कवी ’प्रिय डॉ. बाबासाहेब’ कवितेत ते लिहितात की,
 
१४ एप्रिलला मी ही कविता
पोस्ट केली ना बाबासाहेब की
वाचणार्‍याच पहिलं लक्ष बघा
कवितेखालच्या आडनावात जातं
आणि त्यावरून त्यांच डोस्क
माझ्या जातीचा अंदाज बांधतं
तेव्हा ना बाबासाहेब मला लय मेल्याहून मेल्यागत होतं!
जणू तुम्ही सांगितलेलं स्वातंत्र्य
नव्या मानसिक गुलामगिरीत अडकल
हा आपल्यातला, तो त्यांच्यातला
हे सकल नवं बंधुत्व आकाराला येतं?
किती सत्य लिहिले आहे कवी समरेंद्र यांनी. कारण, पूर्वी स्पृश्य-अस्पृश्य वगैरेंच्या आयामात विषमता होती. पण, आज दृश्य असे आहे की, स्वतःला बहुजन म्हणवून घेणारेही काही असे लोक आहेत. जे समाजात विष पसरवतात की, एखादी व्यक्ती आपल्या जातीची नाही ना, मग ती आपली नाहीच, करा त्या व्यक्तीला विरोध. याचा प्रत्यय अनेकांना अनेकदा आलेला आहे. पण, कुणीही बोलायला सहसा धजावत नाही. मात्र, समरेंद्र त्यांना आलेल्या या आधुनिक विषमतेचा अनुभव अत्यंत न्यायपूर्वक आणि हळुवार मांडतात.

समाजाचे वास्तव अत्यंत निर्लेप आणि सत्य स्वरुपात मांडणारे कवी समरेंद्र हे न्यायाधीश आहे. त्यांची परखड न्यायप्रवीण वृत्ती सत्याचा शोध घेत, या काव्यसंग्रहात मुक्तपणे संचार करते. न्या. समरेंद्र निंबाळकर ’अवघा रंग एक झाला’ काव्यसंग्रह हे कोणत्याही काव्यप्रेमी, संवेदनशिल रसिकांसाठी पर्वणीच आहे.


एका निखळ कवीची ही नितळ प्रामाणिक कविता

न्यायाधीश समरेंद्रची कविता वाचायला सुरुवात केली. सत्याचे विविध पैलू उलगडणारी, मनाचे इंद्रधनुष्य रेखाटणारी, मोगर्‍याचा सुगंध असणारी. पण, भावला; तो त्यातला अंतःकरण छेडणारा बासरीचा आर्त सूर! शेवटी जाणवलं, एका निखळ कवीची ही नितळ प्रामाणिक कविता!
- न्या. मृदुला भाटकर, माजी न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0