कोस्टल रोड येत्या आठ दिवसांत सुरू करणार : मंत्री उदय सामंत
बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा भाग खुला होणार
29-Feb-2024
Total Views |
मुंबई : बहुचर्चित कोस्टल रोडचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या आठ दिवसांत सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी विधानपरिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते.
यावेळी विरोधकांनी उद्योग विभागावर केलेले आरोप सामंत यांनी आकडेवारी मांडत फेटाळून लावले. महायुती सरकारच्या काळात गेल्या १६ महिन्यात महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत आणि उद्योग जगतात क्रमांक एकवर राहिला आहे आणि यापुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावर्षी दावोस मध्ये ३ लाख ७२ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले, त्यापैकी दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला राज्य सरकारने जागाही उपलब्ध करून दिली आहे, असे सामंत यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ८० हजार कोटी रुपयांचे समांजस्य करार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. पण त्यापैकी ऊर्जा संबंधित ५० हजार कोटींचा सामंजस्य करार सापडतच नाही, याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधले. मुंबईत राबवलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा १०० टक्के फायदा झाला आहे. गिरणी कामगारांच्या घरासाठी ठाण्यात २२ हेक्टर जागा उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.