म्हाडाची मुंबई सोडत जाहीर! १ मार्चपासून करा अर्ज!

    29-Feb-2024
Total Views |
MHADA News

मुंबई
: म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रातील १६ निवासी वसाहतींमधील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता लिलाव ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून १ मार्च, २०२४ पासून अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरवात करण्यात येणार आहे.मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील प्रतीक्षा नगर – सायन येथील १५, न्यू हिंद मिल-माझगाव येथील २, स्वदेशी मिल कुर्ला येथील ५, गव्हाणपाडा-मुलुंड येथील ८,तुंगा पवई येथील ३, कोपरी पवई येथील ५, मजासवाडी-जोगेश्वरी येथील १, शास्त्री नगर गोरेगांव येथील १ , सिद्धार्थ नगर गोरेगांव येथील १, बिंबिसार नगर गोरेगांव येथील १७ , मालवणी मालाड येथील ५७, चरकोप येथील ३४, जुने मागाठणे येथील १२, महावीर नगर कांदिवली येथील १२ अशा एकूण १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता इ-लिलावाचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुक अर्जदार मंडळाच्या इ लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी म्हाडाच्या http://www.eauction.mhada.gov.in आणि http://www.mhada.gov.in या अधिकृत संकेत स्थळावरून नोंदणी करणे, अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात.

ऑनलाइन ई-लिलाव प्रक्रिया १४ मार्च पर्यन्त सुरू राहणार आहे. १४ मार्च २०२४ रोजी रात्री ११.५९ नंतर या इ-लिलाव सोडतीत सहभाग घेण्यासाठीची लिंक निष्क्रिय करण्यात येणार आहे. इ-लिलाव प्रक्रियेतील ऑनलाइन बोली १९ मार्च, २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजे दरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. दिनांक २० मार्च, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता इ-लिलाव सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.या अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाड अधिनियमांनुसार सामाजिक व व्यावसायिक आरक्षण ठेवण्यात आले आहे तसेच काही अनिवासी गाळे केवळ बँकेच्या वापराकरिता आरक्षित आहेत. या बाबतचा सविस्तर तपशील म्हाडाच्या संकेत स्थळावर माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आला आहे. ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.बोरीकर यांनी इ-लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता राबविण्यात येणारी प्रक्रिया ऑनलाइन असून अत्यंत पारदर्शक आहे. या गाळ्यांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.