अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

28 Feb 2024 19:11:34

Lodha


अहमदनगर :
अहमदनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या मेळाव्याचे उद्धाटन पार पडले.
 
याशिवाय कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. नमो महारोजगार मेळाव्यात मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या असून १० हजार रोजगार न‍िर्माण होणार आहेत. अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या पाच जिल्ह्यातील जवळपास ६५ हजार युवक-युवतींनी यात सहभाग नोंदवला.
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. तसेच दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, "राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५० तालुक्यातील ५११ गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत."
 
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री लोढा म्हणाले की, "पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. तसेच एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल," अशी माहिती त्यांनी दिली.


Powered By Sangraha 9.0